Sumangalam Lokotsav : कणेरी मठावरील सुमंगल लोकोत्सवात देशी जनावरांचं भव्य प्रदर्शन
कणेरी (Kaneri) येथील सिद्धगिरी मठावर 20 फेब्रुवारीपासून होणाऱ्या सुमंगल लोकोत्सव होत आहे. लोकोत्सवात देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, कुत्रे आणि मांजर यांचे अनोखे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.
Sumangalam Lokotsav : तब्बल 1300 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या कणेरी (Kaneri) येथील सिद्धगिरी मठावर 20 फेब्रुवारीपासून होणाऱ्या सुमंगल लोकोत्सव होत आहे. लोकोत्सवात देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, कुत्रे आणि मांजर यांचे अनोखे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. त्यामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन आणि संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी गाढवांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन होत आहे. 21 ते 23 फेब्रुवारी या काळात हे प्रदर्शन असेल.
प्रदर्शनात प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी 69 लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना 21 हजारांपासून ते एक लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत. पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र आणि राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट गाय आणि बैलाला एक लाखाचे तर म्हैस आणि रेड्याला 51 हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. मांजर, श्वान, शेळी, बोकड यांच्याही स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. देशभरातील विविध जातींचे अश्व येथे पाहायला मिळणार आहेत. देशी अश्व स्पर्धेत प्रथम क्रमांकास एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक जनावरांमध्ये नर आणि मादी अशा दोन गटांत बक्षिसे दिली जाणार आहेत. मठावर गोशाळा असून येथे हजारावर गायी आहेत. नुकतेच येथे भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे. देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
सुमंगलम लोकोत्सवाला विविध मान्यवरांची भेट
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव तयारीची पाहणी करत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजय घाटगे, डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवरांनी भेटी देऊन सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंजना रेडेकर, माजी नगरसेवक अर्जुन माने, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे, डॉ. संपतकुमार यांनीही मठाला भेट दिली. डॉ. संदीप पाटील, प्राचार्य मधुकर बाचुळकर, अशोक वाली, उदय गायकवाड, राजू लिंग्रज, प्रताप कोंडेकर यांनी त्यांना माहिती दिली.
महत्वाच्या इतर बातम्या :