(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विषय हिंदीवरून निघाला आणि लोकसभा उमेदवारीवर पोहोचला; काँग्रेसने शड्डू ठोकला, पण मातब्बर आखाड्यात उतरण्यास तयार होईनात!
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये या जागेवर काँग्रेसने दावा केल्यास ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला असला, तरी निवडणूक कोण लढवणार? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात येत असला, तरी त्यांच्याकडून कोणीही तगडा उमेदवार उमेदवारीसाठी तयार होत नसल्याने जागेसाठी शड्डू ठोकला, पण प्रत्यक्ष आखाड्यात माती लावून घेणार तरी कोण? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता काँग्रेसचे सर्वाधिक प्राबल्य आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये या जागेवर काँग्रेसने दावा केल्यास ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. मात्र, या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार याचे उत्तर मात्र मिळालेलं नाही. गेल्या आठ दिवसांमध्ये दोनवेळा असे प्रसंग घडून आले, ज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते सतेज पाटील (Satej Patil) आणि पी. एन. पाटील (P. N. Patil) यांनी एकमेकांकडे बोट दाखवण्याचे काम केले. त्यामुळे दोघेही लोकसभेची माती लावून घेण्यासाठी तयार नसल्याचे स्पष्ट सूचित करत आहेत.
हिंदीवरून विषय निघाला आणि लोकसभा उमेदवारीवर गेला
काँग्रेस नेते कन्हैयाकुमार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यात पुन्हा एकदा सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांच्यात टोलवाटोलवी दिसून आली. यावेळी पी.एन.पाटील हिंदी चांगले बोलतात, भविष्यात त्यांना चांगला उपयोग होणार असल्याचे सांगत लोकसभा लढविण्यास काहीही हरकत नसल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले. त्यानंतर हिंदी माझ्यापेक्षा चांगली असल्याचे सांगत पी.एन.पाटील यांनी लोकसभेला सतेज पाटीलच योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर कन्हैयाकुमार यांनीही ‘जो बढिया हिंदी बोलेगा, वो दिल्ली जायेगा’ असे वक्तव्य करत गुगली टाकली.
कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे निरीक्षक पृथ्वीराज चव्हाण दौऱ्यावर आल्यानंतर सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी एकमेकांकडे बोट लोकसभेच्या रिंगणातून स्वत:ला बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे काँग्रेसकडून ज्या नावांची चर्चा आहे त्यांची ताकद पाहता काँग्रेसला मातब्बर उमेदवार या मतदारसंघातून द्यावा लागेल, अशी चिन्हे आहेत. बाजीराव खाडे, चेतन नरके यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र, त्यांच्याकडे अजून गंभीरपणे पाहण्यात आलेलं नाही. या जागेसाठी पी. एन. पाटील आणि सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु असताना दोघांनी कोणत्याही प्रकारे अजून तयारी दाखवलेली नाही.
दुसरीकडे या जागेसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून घेऊन या जागेसाठी प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, त्याचबरोबर विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद कमकुवत झाली आहे. दुसरीकडे, मतदारसघांमध्ये राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवाराची मागणी केली आहे. मात्र, अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शरद पवार गटाची ताकद सुद्धा कमजोर झाली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर या तिन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. चंदगड आणि कागलमध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील आमदार आहेत. राधानगरी भुदरगडमधून शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर आमदार आहेत. सतेज पाटील विधानपरिषदेवर, तर जयंत आसगावकर शिक्षक मतदारसंघातून आमदार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या