Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर, हातकणंगल्यात उसना उमेदवार नको! आढावा बैठकीत उद्धव ठाकरेंना पदाधिकाऱ्यांचे साकडे
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काहीही होऊ द्या, पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या.
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन्ही ठिकाणी आपल्याच पक्षाचा उमेदवार असावा अशी सर्वच नेते पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बैठकीत इच्छा व्यक्त केली. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील स्थितीचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून घेतला. दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिंदे गटात गेले असले, तरी मतदार हा ठाकरेंसोबत आहे, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये
आढावा बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. दोन्ही लोकसभा मतदारसंघात काहीही होऊ द्या, पण भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिल्या. ते पुढे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. इंडिया आघाडीत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मात्र, कोणत्याही परिस्थितीसाठी आपल्या पक्षाने तयारी करावी. वेळ आली तर स्वबळाची तयारी सुद्धा पक्षाची असली पाहिजे, अशी आपली तयारी आतापासूनच सुरू करा असे ठाकरे यांनी नेत्यांना आढावा बैठकीत केले.
बैठकीनंतर संजय पवार काय म्हणाले?
दरम्यान, आढावा बैठकीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचाच असला पाहिजे, ही प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका आहे. शेवटी निर्णय उद्धव साहेबांचा असतो. मातोश्रीच्या निर्णयानुसार आम्ही काम करत राहणार. आम्ही 35 ते 40 वर्ष राबत आहोत, तिथं आम्हाला वाटतं शिवसेनाचाच उमेदवार असावा असे वाटते. भविष्यात दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाचाच खासदार असणार ही अपेक्षा आहे.
कोल्हापुरात शिवसेनेला खिंडार
शिवसेना भाजप युतीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही खिंडार पडले आहे. जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात आहेत. एकमेव आमदार प्रकाश आबिटकरही शिंदे गटात आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके हे सुद्धा शिंदे गटात असल्याने ठाकरे गटाची ताकद मर्यादित झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीमध्येही फूट पडल्याने परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लोकसभेला सामोरे गेल्यास ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता आहे. आज (19 ऑगस्ट) कोल्हापुरात बोलताना सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद नसल्याचे सांगत या महिन्याच्या फाॅर्म्युला तयार होईल, असा दावा केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या