Rajaram Sakhar Karkhana : 'राजाराम'च्या सभेवरूनही बावड्यात 'रामायणा'ची चिन्हे; वार्षिक सभा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी असल्याने पाटील गटाचा आक्षेप
Rajaram Sakhar Karkhana : कारखान्याची वार्षिक सभा 29 सप्टेंबर रोजी आणि सकाळी 11 वाजता ठेवण्यात आल्याने विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
कोल्हापूर : 'गोकुळ'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ, हुर्रेबाजी तसेच हाणामारीनंतर आता कसबा बावड्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेवरूनही रामायणाची दाट चिन्हे आहेत. कारखान्याची वार्षिक सभा 29 सप्टेंबर रोजी आणि सकाळी 11 वाजता ठेवण्यात आल्याने विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक लांबत असल्याने सभेची तारीख आणि वेळ बदलण्यात यावी, अशी मागणी मोहन सालपे, रवि रेडेकर यांनी केली आहे.
29 तारखेला सभेला अनेक सभासदांना येणं अशक्य
सभेच्या आदल्या दिवशी अनंत चतुर्दशी असल्याकडे विरोधी परिवर्तन आघाडीने लक्ष वेधले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अनेक सभासदांचाही समावेश असतो. कारखान्याचे कार्यक्षेत्र सात तालुक्यातील 122 गावांमध्ये आहे. यामधील अनेक गावे दुर्गम भागातील असल्याने सभेदिवशी वेळेत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे प्रामाणिक सभासदांनी सभेला येऊच नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अहवाल आला नाही, प्रश्न कसे विचारायचे?
दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेत लेखी प्रश्न विचारण्यासाठी 22 सप्टेंबर मुदत देण्यात आली आहे, पण कारखान्याकडून अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अहवाल पाहून प्रश्न कधी तयार करणार? अशी विचारणा मोहन सालपे यांनी केला. गेल्या सात वर्षापासून सभेची वेळ आम्ही सकाळी अकरावरून एक वाजता करण्याची मागणी करत आहोत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आऱोपही यावेळी करण्यात आला.
राजाराम सभासद अपात्र कळीचा मुद्दा होण्याची चिन्हे
दुसरीकडे, सत्ताधारी महाडिक गटाला याच महिन्यात मोठा धक्का बसला असून राजाराम कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर साखर आयुक्तांनी हा निर्णय दिला आहे. गेल्या सभासद अपात्रतेचा मुद्दा कळीचा मुद्दा झाला आहे. कारखान्याची पार पडलेली निवडणूकही याच मुद्यावर केंद्रित झाली होती.
कारखान्याच्या निवडणुकीच्या आधीच बोगस सभासदांचा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई करावी, या सभासदांची नावं कमी करावी अशी मागणी करत सतेज पाटलांनी न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यानंतरही निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये महाडिक गटाने बाजी मारत सत्ता कायम ठेवली. साखर आयुक्तांनी आता सतेज पाटील यांच्या तक्रारीवर निर्णय घेत या कारखान्यातील 1272 सभासद अपात्र ठरवले आहेत. त्यामध्ये महाडिक कुटुंबातील 10 सभासदांचा समावेश आहे. यामुळे महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या