(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bidri Sakhar Karkhana : मेहुण्या-पाहुण्याचे फिस्कटलं; बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ए.वाय. पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकरांचं जमलं!
कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारणातील अंदाज बांधणे मुश्कील होत चालला आहे.
कोल्हापूर : ऐन दिवाळीत कोल्हापुरात बिद्री कारखान्याच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोपांचे फटाके फुटत आहेत... मेव्हण्या-पाहुण्यांचं जुळणार की फाटणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष होते. मात्र, तो प्रश्न आता निकाली लागला आहे. बिद्रीच्या राजकारणात मेहुण्या-पाहुण्यांचं फिस्कटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटासोबत राहणार असल्याचे समोर आला आहे. सत्ताधारी माजी आमदार के पी पाटील गटाला हा धक्का मानला जात आहे.
कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारणातील अंदाज बांधणे मुश्कील होत चालला आहे. मागीलवेळी राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी करत बिद्री कारखान्यावर सत्ता काबीज केली होती. त्यामध्ये माजी आमदार के.पी. पाटील, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ए.वाय पाटील यांचा समावेश होता. मात्र, यंदा मेहुण्या पाहुण्यांचे फिस्कटल्याने ए. वाय. पाटील कोणासोबत राहणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
बिद्री कारखान्याच्या निमित्ताने के. पी. पाटील आणि ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करूनही त्यांच्यातील संघर्ष मिटण्याचे नाव घेत नसताना ए. वाय. पाटील यांनी के. पी पाटील यांना धक्का दिला आहे. ए. वाय. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या छावणीत जाऊन के. पी. पाटील यांना टक्कर देण्याचे ठरवले आहे. खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते समरजिंतसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर व ए. वाय. पाटील विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात बिद्रीचे राजकारण पेटणार आहे.
मध्यस्थीनंतरही मुश्रीफांना अपयश
बिद्रीच्या राजकारणात के.पी विरुद्ध ए.वाय असा राजकीय संघर्ष विकोपाला गेल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर तोडगा काढण्याची आश्वासन दिले होते. केपी आणि ए. वाय. हे दोघे एकच असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खुल्या व्यासपीठावर सांगितले होते. मात्र ए. वाय. पाटील यांनी थेट मुश्रीफ यांच्या जवळ जाऊन आपल्यावर होत असलेला अन्यायाचा पाडा वाचून दाखवला. राधानगरी तालुक्यातील संचालक मंडळाच्या सर्व सहा जागांची आणि बिद्रीचे अध्यक्षपद यावर तोडगा निघत नसल्याने माझे आपल्याशी जमत नसल्याचा निरोप मंत्री मुश्रीफ यांना दिला.