Bidri Sakhar Karkhana : बिद्री कारखान्याच्या इतिहासातील भ्रष्टाचारी चेअरमन असणाऱ्या के पी पाटलांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये; आमदार प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये विधानसभेमध्ये भ्र शब्दही न काढणारे के पी पाटील यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केल्याची टीका आबिटकर यांनी केली.
कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्यातील मागील पाच वर्षातील खरेदीची (पर्चेस) माहिती जाहीर करावी या खरेदीमध्ये 40 टक्क्यांपेक्षा अधिकची तफावत असून बाजार मूल्य व इतर खाजगी कारखान्याची पेक्षा हा फरक कमी सिद्ध करावे. यासह कारखान्याच्या सर्वच कामकाजामध्ये भ्रष्टाचाराचे महामेरू-बिद्री लुटारू म्हणून ओळख असणाऱ्या बिद्री कारखान्याच्या इतिहासातील भ्रष्टाचारी चेअरमन असणाऱ्या के पी पाटील यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये असा खोचक टोला आमदार प्रकाश आबिटकर यांनी लगावला.
के पी पाटील यांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत
विधानसभेचे वारे वाहू लागल्याने माजी आमदार के पी पाटील यांना निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. ते अगदी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर आरोप करत असून त्यांनी बिद्री कारखान्यामध्ये गेल्या 40 वर्षांपासून संचालक व चेअरमन पदावर आज तागायत असून त्यांचे संपूर्ण कुटुंबच बिद्री कारखान्याच्या खिळ्या-मोळ्यावर जगलेले आहेत. ते आता कारखान्यामध्ये मी कसा पारदर्शक पद्धतीने कारभार चालवल्याचे दाखले देतात परंतु मागील पाच वर्षांमध्ये त्यांनी मागील पाच वर्षांच्या कालावधीतील कारखान्यांमध्ये केलेल्या पर्चेसमध्ये बाजार मूल्य तसेच खाजगी कारखान्यापेक्षाही 40 टक्केहून अधिकची तफावत आहे ही जर तफावत खरी नसेल तर त्यांनी तसे जाहीर करावे ही खरेदी करताना पुणे, मुंबई येथील नेहमीच्या ठेकेदारांना काम दिले ही बाबही शंकास्पद आहे.
मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले
आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये विधानसभेमध्ये भ्र शब्दही न काढणारे के पी पाटील यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी आमदारांनी अगोदर आपली योग्यता तपासून कारखान्याच्या परचेसची मागील पाच वर्षांची माहिती सर्वांसमोर सादर करावी.
नाहक बदनामी करण्याचे काम करत आहेत
विधानसभेचे वातावरण तापू लागल्याने के.पी. पाटील हे माझी वैयक्तिक खालच्या पातळीवर भाषा वापरून नाहक बदनामी करण्याचे काम करत आहेत. हे मतदारसंघातील सुज्ञ व स्वाभिमानी जनतेला पटणारे नसून त्यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मतदार संघामध्ये कोणती भरीव कामे केलीत हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणतेही विकासाचे मुद्दे नसलेला, मतदारसंघाचे व्हिजन नसलेल्या निष्क्रिय माजी आमदार के पी पाटील यांनी माझ्यावरील वैयक्तिक चिखल फेक बंद करून विकासाच्या मुद्द्यावर बोलावे आम्ही त्याला उत्तर देण्यास समर्थ आहोत, असे म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या