Weather Update : सातारा जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, कसं असेल पुढील पाच दिवस वातावरण?
हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Weather Update : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाची बरसात सुरू आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यासाठी आजपासून पुढील चार दिवस पावसाचे असणार आहेत. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्याबद्दल तीन दिवसापासून धुवाँधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहरात जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.
जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला असून 26 जुलै रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पाच दिवस ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरी
दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याने 51 टीएमसीचा टप्पा गाठला आहे. अजून धरण पूर्ण भरण्यासाठी 54 टीएमसी पाण्याची गरज आहे. इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात संततधार आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. यामुळे धरणातील आवक वाढली आहे. परिणामी धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
शनिवारी सकाळपर्यंत 24 तासांत जिल्ह्यातील नवजा येथे 100 मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून आतापर्यंत नवजाला 2 हजार 720 मिलमीटर पर्जन्यमान झाले. यामुळे नवजाच्या पावसाची तीन हजार मिलीमीटरकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोयना येथे आतापर्यंत 2 हजार 286 मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही 24 तासांत 95 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
इतर महत्वाच्या बातम्या