Kolhapur News : सीपीआरमधील मॉड्युलर ओटी आणि बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन
Kolhapur News : या मॉडयुलर ओ.टी. आणि बालरोग अतिदक्षता विभागाचा लाभ कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना होईल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
![Kolhapur News : सीपीआरमधील मॉड्युलर ओटी आणि बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन Inauguration of Modular OT and Pediatric Intensive Care Unit at CPR kolhapur Kolhapur News : सीपीआरमधील मॉड्युलर ओटी आणि बालरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/19/4cfc9c48bca11c49f2a407f394fbeee11679224456423444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथील मॉड्युलर ओटी आणि बालरोग अतिदक्षता विभागाचा फायदा हा कोल्हापूरसह शेजारीर जिल्ह्यांना होईल असं पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं. या मॉडयुलर ओ.टी. आणि बालरोग अतिदक्षता विभागाचं उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील कुरुंदवाडे, श्रीमती थोरात आदी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, येत्या काळात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सुसज्ज व्हावे, यासाठी 38 कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार केला असून लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात येईल. कोल्हापूरमध्ये उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यांना फायदा झाला आहे. येत्या काळात सीपीआरच्या गरजा पूर्ण करुन सर्व जनतेचे स्वप्न पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या मॉडयुलर ओ.टी. व बालरोग अतिदक्षता विभागाचा लाभ कोल्हापूरसह शेजारील जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना होईल. नजिकच्या काळात या रुग्णालयामध्ये सांधेरोपण, अवयव प्रत्यारोपण, कानाचे कॉक्लींअर इप्लांट सारख्या महत्वाच्या शस्त्रक्रियाही पार पडतील, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोरोनासारख्या कठीण काळात या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफने केलेल्या कामाचे कौतुक केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वैद्यकीय क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक योजना तत्काळ मंजुर केल्याबद्दल केसरकर यांना धन्यवाद दिले. शेंडा पार्कमधील हॉस्पिटल लवकरच कार्यान्वित होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वागत अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षीत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसंतराव देशमुख यांनी केले. कोविडच्या तिसऱ्या लाटेत लहान बालकांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीच्या कोविड निधीमधून बालरोग अतिदक्षता विभागाच्या श्रेणीवर्धनासाठी 75 लाख रुपये बांधकाम खर्च व 1 कोटी 34 लाख रुपये यंत्रसामुग्री, साधनसामुग्री खरेदी करण्याकरीता निधी प्राप्त झाला. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण निधीमधुन दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या कामास मंजुरी मिळाली. यामधून कान, नाक, घसाशास्त्र विभागाच्या मॉडयुलर ओ.टी. करीता 1 कोटी 93 लाख रुपये व ट्रामा केअर युनीटच्या मॉड्युलर ओ.टी. करीता 2 कोटी 22 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)