Dhananjay Munde : पायतानाची भाषा करणाऱ्यांना मुश्रीफांनी नुसती प्रेमाने मिठी मारली, तरी बरगड्या राहतील का? धनंजय मुंडेंचा आव्हाडांना खोचक टोला
शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याचाच संदर्भ देत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
कोल्हापूर : ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात. ज्यांनी पायतानाची भाषा केली त्यांना मुश्रीफ साहेबांनी प्रेमाने जरी मिठी मारली तरी बरगड्या राहतील का? असा खोचक टोला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला. कोल्हापुरात शरद पवारांची जाहीर सभा झाल्यानंतर आज अजित पवार गटाकडून उत्तर सभा होत आहे. शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती टीका केली होती. बिळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत. या सापांना ठेचण्यासाठी कोल्हापुरी पायताणाचा वापर करावा लागेल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि आव्हाडांमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला होता. त्याचाच संदर्भ देत मुंडे यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की शरद पवार साहेबांची सभा झाली आणि लोक आम्हाला विचारू लागले उत्तर देण्यासाठी तुमची सभा होणार का? आम्ही सांगितलं की आमची सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्व सभा होणार आहे. अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होता आता तुम्ही लोकनेते देखील आहात. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल तर ते नागरीक कधी सहन करणार नाहीत. ज्यांना कोल्हापूरचे पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात. बीड आणि कोल्हापूरचं आगळ वेगळं नात आहे. तुम्ही ऊस पिकवणारे आणि आम्ही ऊस तोडणारे आहोत, असे मुंडे म्हणाले.
दुःख व्यक्त करायचं नाही का?
दरम्यान, बीडमध्ये जे बोललो ते चुकीचं काहीच नव्हतं, असे छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले. फक्त माझे दुःख व्यक्त केलं होतं. दुःख व्यक्त करायचं नाही का? शरद पवार यांच्यावर टीका केली नव्हती, अशी प्रतिक्रिया आपले मनोगत व्यक्त करताना भुजबळ यांनी दिली. ते म्हणाले की, शाहू महाराजांचे पहिले राजे होते त्यांनी सर्वात पहिल्यांदा मागासवर्गीयांना आरक्षण दिलं. त्यांच्या नगरीत आम्ही आशीर्वाद घ्यायला आला आहोत. सभेसाठी झालेली गर्दी अजित पवारांसोबत असल्याची साक्ष देत आहे.
पवार साहेब ज्यांना गुरू मानतात ते चव्हाण साहेब देखील अशाच पद्धतीने सत्तेमध्ये गेले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, मला माझ्या समाजासाठी सत्ता हवी आहे. आम्ही देखील आम्ही आमच्या समाजासाठी सत्तेत गेलो आहोत. लोकांची सेवा करणार आहोत. छगन भुजबळ यांनी सत्तेत का गेलो हे पटवून देण्यासाठी विविध दाखले देण्याचा प्रयत्न केला. कधी महात्मा फुलेंचा संदर्भ दिला तर कधी शाहू महाराज, तर कधी यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. मात्र, त्यांनी शरद पवारांवर टीका करणे टाळले.
इतर महत्वाच्या बातम्या