(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Tatkare : गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्री देखील निवडले जातील; अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचा दावा
गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्री देखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळेल, असा दावा त्यांनी केला.
कोल्हापूर : शरद पवार यांच्यामुळेच आम्ही मोठे झालो आहोत, पण आम्ही देखील पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली. पक्षवाढीसाठी आमचा देखील खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोल्हापुरात (Kolhapur News) बोलताना दिली. अजित पवार गटाची उत्तर सभा आज कोल्हापुरात होत आहे. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार आणि जाहीर सभा होणार आहे. या सभेला अजित पवार गटाचे सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि पालकमंत्री देखील निवडले जातील. राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळेल, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
तपोवन मैदानात सभा घेण्याचा धाडस हसन मुश्रीफ करु शकतात. उत्तर देण्यासाठी ही सभा नाही, असे तटकरे म्हणाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आता लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटाकडून म्हणणे सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे." जयंत पाटील यांनी आधीच विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईचे पत्र दिले आहे. या संदर्भात पुढील प्रक्रिया सुरु आहे.
म्हणून बॅनरवर शरद पवारांचे फोटो लावले नाहीत
तटकरे यांनी सांगितले की, "महाविकास आघाडीमध्ये सामील होताना शिवसेनेबरोबर गेलो. मग आता विचारसरणी बदलली असं होत नाही. आम्ही आमचा विचार बदलला नाही. आमच्या विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत. शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण त्यांनी आमच्यासोबत सामील होण्याबाबत आजही अपेक्षा आहे. साहेबांना त्रास होऊ नये म्हणून बॅनरवर फोटो लावलेले नाहीत. ईडीला घाबरुन आम्ही गेलो हा शरद पवार यांचा आरोप चुकीचा आहे."
अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून आमच्यावर टीका
"हे सरकार शेतकऱ्यांसाठी संवेदनशील आहे. मला दोन्ही विरोधी पक्षनेत्यांची कीव येते. काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे. उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेत आहेत. अजित पवार यांना मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्याकडून आमच्यावर टीका होत आहे," असं तटकरे यांनी म्हटलं. "2004 ला राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री झाला असता, पण का संधी गमावली माहित नाही, ज्यांचे जास्त आमदार असतील तो मुख्यमंत्री होईल, आम्हाला मुख्यमंत्रीपदाची घाई नाही. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं सर्वांनाच वाटते," असंही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या