Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी
Jalna News: झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
![Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी maharashtra News Jalna news Agriculture Minister Abdul Sattar inspected the agricultural damage in Jalna Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/18/052868dbb8c13312a81d0d59feb02d421679135093023443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna News: मराठवाड्यातील (Marathwada) अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा मोठा फटका रब्बीच्या पीकांना बसतोय. काढणीला आलेले गव्हाची पीकं अक्षरशः आडवी झाली आहेत. तर ज्वारीच्या पिकाचे देखील नुकसान झाले आहेत. तसेच फळबागांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टीमुळे खरिपाचे हंगाम गेले आणि आता अवकाळी पावसाने रब्बीच्या पीकांचे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून देखील पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. तर आज खुद्द कृषीमंत्री सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र असे असले तरीही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील अंबडच्या वडीगोद्री येथील अवकाळी पाऊस व वादळीवारा यामुळे नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, नायब तहसीलदार धनश्री बालचित, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
इतर महत्वाच्या बातम्या :
Marathwada Rain: अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)