(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ujjwal Nikam : ठाकरे की शिंदे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कुणाच्या बाजूने? उज्ज्वल निकम यांनी सविस्तर सांगितलं!
Ujjwal Nikam On Maharashtra Political Crisis : "महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या विषयात सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय देईल हे आताच सांगणे कठीण आहे," अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी होणार आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narevekar) यांच्याविरोधात दाखल याचिकेबाबतही सुनावणी होणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयात काय घडू शकतं याबाबत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "या विषयात सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय देईल हे आताच सांगणे कठीण आहे," असं उज्ज्वल निकम म्हणाले.
'निर्णय आताच सांगणं कठीण'
सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेच्या आधारे निर्णय दिला आहे. शिवसेना ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे कायमस्वरुपी संस्थापक राहतील अशी घटना होती. मात्र निवडणूक आयोगाने त्यांना लोकशाहीमध्ये कोणतेही पद हे तहहयात राहू शकत नाही, असं म्हटलं होतं. पुढे त्यांना निवडणूक करुन अध्यक्ष केले होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रामुख्याने पक्षाची घटना तपासली जाईल. त्यामध्ये पक्षाच्या चिन्हावर किती निवडून आलेले आहेत, ते कोणाच्या बाजूने आहेत हे तपासले जाईल. निवडणूक आयोगाचा शिवसेनेबाबत जो निर्णय आहे तो घटनेच्या आधारे आहे का ते तपासले जाईल आणि त्यानंतर काय तो निर्णय घेतला जाईल. मात्र तो निर्णय काय असेल हे आताच सांगता येणं कठीण आहे, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
VIDEO : Ujjawal Nikam : सत्ता संघर्षाच्या सुनावणीत काय होणार, उज्ज्वल निकम म्हणतात...
'या' दोन प्रकरणांवर सुनावणी
शिवसेनेच्या दोन मोठ्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार असल्याने याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. त्याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तर विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरही आज सुनावणी होईल. आमदारांच्या निलंबनासंदर्भात अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पारडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांचे क्रमांक अनुक्रमे 18 तसंच 19 असे आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यामध्ये पडणार का, या सुनावणीत नेमकं काय होणार, कोर्ट काही निर्देश देणार का याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा