Jalgaon Rains : जळगावात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस, वादळाच्या तडाख्यात सापडल्याने साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू
Jalgaon Rains : जोरदार वादळाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jalgaon Rains : जोरदार वादळाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा (Sheep) जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात घडली. जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत मेंढपालांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
वादळाचा तडाखा सहन न झाल्याने मेंढ्या दगावल्या
जळगाव जिल्ह्यात अनेक भागात काल रात्री आठ ते साडेआठ दरम्यान वादळीवारा आण गारपिटीसह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशाच एका घटनेत जामनेर तालुक्यामधील पिंपळगाव आणि नांदगाव परिसरातील शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळांच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळाचा तडाखा जोरदार असल्याने आणि बचावासाठी कोणताही आडोसा जवळ नसल्याने या मेंढ्या वादळ सहन करु न शकल्याने जागीच मरण पावल्या. या घटनेत मेंढी पालन करणाऱ्या मेंढपालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
जळगावात सलग पाचव्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
सलग पाचव्या दिवशी जळगाव जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. यात घरांचे आणि शेती पिकांचे नुकसान झालं आहे. यामध्ये प्रामुख्याने मुक्ताईनगर आणि जामनेर तालुक्यात नुकसान झालं आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी रात्री झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून सुरक्षारक्षकाचा मृत्यू
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील महावीर जिनिंगची भिंत कोसळून ज्ञानदेव मोतीराम पाटील (वय 60 वर्षे, रा.आसोदा) या सुरक्षारक्षकाचा (Security Guard) मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (29 एप्रिल) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानदेव पाटील हे मनपा आयुक्तांच्या निवासस्थानावर सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. शनिवारी पाऊस सुरु असताना पाटील ड्युटी संपवून घराकडे निघाले होते. महावीर जिनिंगच्या संरक्षक भिंतीजवळून सायकलीवरुन जात असताना पावसाच्या तडाख्याने अचानक जिनिंगची भिंत कोसळली. त्या भिंतीच्या ढिगाराखाली दबून त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा
Jalgaon: वादळी वाऱ्याने उभा कंटेनरही उलटला, कंटेनरखाली दबून दोघांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील घटना