(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gulabrao Patil : 'जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा', गुलाबराव पाटलांची मागणी
जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
Gulabrao Patil on Jitendra Awhad : विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन केले. मात्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) फोटो फाडल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपकडून राज्यभरात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले जात आहे. आता यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड हे मनोविकृत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जितेंद्र आव्हाड यांनी केलेला प्रकार हा वाईट आहे. अशा माणसावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आपल्या हातात आहे हे ज्या माणसाला कळत नाही हा मनोविकृत माणूस आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कायम दोन समाजात भानगड लावण्याचे प्रयत्न केले आहेत, असा टीका त्यांनी यावेळी केली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडला आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणीही गुलाबराव पाटलांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आले. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षात राहिले नाही. विरोधक त्यावर राजकारण करणार, मी मनुस्मृती जाळू नये म्हणूनही राजकारण केले. माझ्या हातून चूक झाली. मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो. मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो आहे म्हणून फाडलं, असे म्हणत त्यांनी माफी मागितली.
भुसावळ दुहेरी हत्याकांडावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, जळगावच्या (Jalgaon) भुसावळ (Bhusawal) शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ हे कायम हॉट सीटवर आहे. मागच्या काळातही भुसावळमध्ये बऱ्याच गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस अधीक्षक व त्यांचे पथक हे भुसावळमध्ये आहे. काही वर्षांपूर्वी संतोष बारसे यांच्या वडिलांचीही हत्या झाल्याची माहिती आहे. काल झालेली घटना पूर्व वैमनस्यातून की गँगवॉर होती? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही, अशी पतिक्रिया त्यांनी दिली.
आणखी वाचा
"केवळ विरोधक म्हणून आव्हाड यांच्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही" : छगन भुजबळ