एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDvsWI | टीम इंडियाचा शानदार मालिका विजय, वेस्ट इंडिजवर चार विकेट्सने मात
कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियानं कटकच्या तिसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजचा चार विकेट्सनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकून 2019 या वर्षाची विजयी सांगता केली.
कटक : कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या दमदार फलंदाजीमुळे टीम इंडियानं कटकच्या तिसऱ्या वन डेत वेस्ट इंडिजचा चार विकेट्सनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकून 2019 या वर्षाची विजयी सांगता केली. या सामन्यात विंडीजनं टीम इंडियासमोर 316 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान चेंडू आणि चार विकेट्स राखून पार केलं. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलनं १२२ धावांची सलामी देऊन टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. रोहितनं 63 तर राहुलनं 77 धावांची खेळी उभारली. त्यानंतर विराटनं 85 धावा आणि रविंद्र जाडेजानं नाबाद 39 धावांची खेळी करुन टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
विंडीजने विजयासाठी दिलेल्या दिलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकं झळकावत पहिल्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन होल्डरने रोहित शर्माला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर लोकेश राहुलही माघारी परतला. त्यानंतर आलेले श्रेयस अय्यर, केदार जाधव आणि ऋषभ पंत लगोलग आऊट झाल्याने टीम इंडिया बॅकफूटवर आली होती.
मात्र यानंतर विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. 85 धावांवर किमो पॉलने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर रविंद्र जाडेजाने शार्दुल ठाकूरच्या साथीने उरलेल्या धावा पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दूलने अवघ्या सहा चेंडूत 17 धावा केल्या तर जाडेजाने 39 धावा केल्या. विंडीजकडून किमो पॉलने 3 तर शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डच्या स्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजनं टीम इंडियासमोर 316 धावांचं आव्हान ठेवलं होतं. निकोलस पूरननं 64 चेंडूत 89 धावा कुटल्या होत्या तर पोलार्डनं तीन चौकार आणि सात षटकारांसह 73 धावा फटकावल्या होत्या. विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली होती. सुरुवातीला शाई होप आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. भारताकडून नवदीप सैनीने 2 तर रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement