Fit @ Fifty : वयाच्या साठी-पन्नाशीतही जिद्द भारी! हिमालय कवेत घेणार 10 रणरागिणी
Fit @ Fifty : साठीच्या वयात ही त्यांनी 4 हजार 977 किमीची अत्यंत खडतर मोहीम स्वीकारली आहे.
Fit at Fifty : वयाची पन्नाशी ओलांडली की जास्त धावपळ करू नये असं म्हणतात. आणि वयाची साठी ओलांडली की आराम करावं असा सर्वसामान्य समज असतो. मात्र, भारतातील (India) दहा महिला या विचाराला फाटा देत "फीट@फिफ्टी" या खास मोहिमेला निघाल्या आहेत. या महिला गिर्यारोहक (Trekking) तब्बल 4 हजार 977 किलोमीटरच्या हिमालयीन (Himalaya Mountain) ट्रेकवर चालल्या आहे.
जगातील प्रथम ट्रान्स हिमालयीन ट्रॅकिंग मोहीम
पद्मभूषण आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वात या महिला गिर्यारोहक 12 मार्च पासून अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून मोहिमेला सुरुवात करणार आहे. या दहा रणरागिणींमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बिमला नेगी देऊस्कर या सुद्धा आहेत.
हिमालयीन आव्हान
उत्तुंग हिमालय हा नेहमीच जगभरातील गिर्यारोहकांचे आकर्षण आणि तेवढेच मोठे आव्हान देखील आहे. प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते की, जीवनात एकदा तरी हिमालयात गिर्यारोहण करावे. मात्र, भारतातील दहा महिलांनी गिर्यारोहणात त्यांच्या निवृत्तीनंतर हिमालयाचे आव्हान स्वीकारले आहे. भारतातील पहिल्या एव्हरेस्ट वीर महिला असण्याचा बहुमान असलेल्या बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वात दहा महिला तब्बल 5 महिने चालणाऱ्या खास ट्रेकिंग मोहिमेवर निघाल्या आहेत. जगातील सर्वात जास्त कालावधीच्या आणि किंबहुना सर्वात जास्त अंतराच्या या खास ट्रेकिंग मोहिमेत या महिला उंच पर्वतांवर पर्वत चढणार नाही, तर हिमालयातील अत्यंत खडतर दऱ्या खोऱ्यातून तब्बल 4 हजार 977 किमीची पायी ट्रेकिंग करणार आहे. त्यामध्ये अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या हिमालयातील 39 खिंडी या महिला ट्रेकिंग करत पार करणार आहे.
कशी होईल मोहीम?
12 मार्चला अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून सुरू होणारी ही मोहीम पाच महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात काश्मीर मधील टायगर हिलला संपणार आहे. पाच महिन्यांच्या या ट्रान्स हिमालयीन एक्सपिडीशन मध्ये 10 महिला ट्रेकर्स अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल, नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख पार करत टायगर हिलला पोहोचतील. विशेष म्हणजे पाच महिने चालणाऱ्या ट्रेकिंगच्या काळात या महिला जवळपासचे हॉटेल्स किंवा वस्त्यांमध्ये नाही तर हिमालयात टेन्टमध्ये राहून ही मोहीम पूर्ण करणार आहे...
हिमालय कवेत घ्यायला निघालेल्या दहा रणरागिणी कोण?
या मोहिमेचा नेतृत्व पद्मभूषण आणि एवरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल करणार आहे. विशेष म्हणजे सध्या बछेंद्री पाल यांचे वय 67 वर्ष असून याच जून महिन्यात त्या वयाचे 68 वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र, या वयात ही त्यांनी 4 हजार 977 किमीची अत्यंत खडतर मोहीम स्वीकारली आहे. त्यांच्या सोबत पश्चिम बंगालच्या चेतना साहू (55 वर्ष), छत्तीसगडच्या सविता धपवाल (53 वर्ष), गुजरातच्या चौला जहागीरदार (64 वर्ष) आणि गंगोत्री सोनजी (63 वर्ष), झारखंडच्या पामो मुर्मू (54 वर्ष), राजस्थानच्या डॉ सुषमा बिस्सा (56 वर्ष), कर्नाटकातील वासुमती श्रीनिवासन (68वर्ष) आणि शामला पद्मनाभन (65 वर्ष), आणि महाराष्ट्रातील बिमला नेगी देऊस्कर (56 वर्ष ) या महिला सहभागी असणार आहे...
फिट @ फिफ्टी
पाच महिन्यांच्या या ट्रान्स हिमालयीन एक्सपिडीशन मध्ये महाराष्ट्रातील एकमेव महिला गिर्यारोहक विमला नेगी देउस्कर सहभागी झाल्या आहेत. आम्ही सर्व महिलांनी वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. काहींनी तर वयाची साठी ही ओलांडलेली आहे. मात्र, आम्ही सर्व या वयात ही फीट आहोत हे दाखवण्यासाठी या मोहिमेला आम्ही fit@fifty असे नाव दिल्याचे बिमला नेगी देऊस्कर म्हणाल्या. या मोहिमेसाठी आम्ही भरपूर तयारी केली आहे. हिमालयातील कोणतीही मोहीम तुमच्या शारीरिक क्षमतेसह मानसिक कणखरतेची परीक्षा घेते. त्यामुळे आम्ही दोन्ही अंगाने तयारी केली आहे. हे टीम इव्हेंट असल्याने आम्ही एकमेकींना भेटून एकमेकींना समजून घेतले आहे. जगातील ट्रेकिंगच्या इतिहासात पहिल्यांदा होत असलेल्या एवढ्या जास्त लांबीच्या आणि एवढ्या जास्त कालावधीसाठी चालणाऱ्या खास ट्रेकिंग मोहिमेचे नेतृत्व एवरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्याकडे असल्याने आणि त्या एक कठोर मात्र कणखर कॅप्टन असल्याने आम्ही सर्व यशस्वी होऊ असा आमचा विश्वास असल्याचे बिमल नेगी देऊस्कर म्हणाल्या.
सैन्य दलाची मदत
हिमालयातील कठोर हवामानात ५ महिने प्रवास करायचे असल्याने या महिलांना सैन्य दलाची मदत ही मिळणार आहे. सैन्याची एक तुकडी त्यांच्या सोबत सुरक्षेच्या दृष्टीने राहणार असून त्यांची ही मदत या मोहिमेत मोलाची ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :