Anjali Damania : धनंजय मुंडेंच्या 'त्या' दाव्यामागचे सत्य एबीपी माझाकडून समोर, अंजली दमानिया म्हणाल्या; 'आता तरी या माणसाला...'
Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी केलेल्या दाव्यामागचे सत्य एबीपी माझाने समोर आणले आहे. याबाबत अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Anjali Damania on Dhananjay Munde : बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर 2857 रूपयात म्हणजे सर्वात कमी दरात खरेदी केल्याचा दावा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला होता. मात्र, एबीपी माझाने केलेल्या रियालिटी चेकमध्ये धक्कादायक माहिती समोर आलीय. कृषी विभागाने (Agriculture Department) जादा दरानेच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर खरेदी केल्याचं दिसून आले आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
कापूस, सोयाबीन, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बळकटीकरण योजनेच्या खरेदीत जवळपास पावणेतीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात हा भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर 2857 रूपयात म्हणजे सर्वात कमी दरात खरेदी केल्याचा दावा मुंडेंनी केला होता. एबीपी माझाने केलेल्या रियालिटी चेकमध्येत्यात कृषी विभागाने जादा दरानेच बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर खरेदी केल्याचं दिसून आले. एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ याआधी तेवढ्याच क्षमतेचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर कमी किमतीत खरेदी करत होतं असे पुरावे ही एबीपी माझाच्या हाती लागले आहे. त्यामुळे ही महागडी खरेदी करून शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
या माणसाला आता बाहेरची दिशा दाखवावी
याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या की, तुम्ही रियालिटी चेक केल्यानंतर समजले आहे की, मी जे म्हटले आहे ते अतिशय योग्य आहे. मी ज्या दिवशी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी संध्याकाळी मला कळाले की, नागपूर खंडपीठाकडे याबाबत याचिका दाखल झाली आहे. अनेक ठिकाणी बॅटरी स्प्रेअरची किंमत 2400 ते 2600 रुपये आहे. मी नॅनो युरिया, नॅनो डीएपी ऑनलाईन घेतले. मला नॅनो युरिया 92 रुपयाला आणि नॅनो डीएपी 261 रुपयाला पडले. नॅनो युरिया मी 92 रुपयांना घेतले ते आपल्या कृषी विभागाने 220 रुपयाला घेतले आहे. जे नॅनो डीएपी मी 261 रुपयाला घेतले ते कृषी विभागाने 561 रुपयाला घेतले आहे. धनंजय मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, याचा भाव हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच आहे तर आता ते सर्व माझ्या नावाच्या बिलासकट मी काल रात्री अकरा वाजता घेतली आहे. यावरून कळते की मी जे म्हटले ते अतिशय योग्य होते. फार मोठा घोटाळा झालेला आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना या माणसाने फसवलंय. कुठल्याही परिस्थितीत या माणसाला आता बाहेरची दिशा दाखवावी, असा हल्लाबोल त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.
धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे परममित्र
धनंजय मुंडे यांच्याबाबत सरकार कुठलीही ॲक्शन घेताना दिसून येत नाही. याबाबत विचारले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, त्यांना मुंडेंना वाचवायचे आहे, पदोपदी त्यांना आपल्या लोकांना वाचवायचे आहे. धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांचे परममित्र आहेत आणि अजित पवारांचे देखील परममित्र आहेत. आपल्याला मित्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वाचवायचं नाही. महाराष्ट्राच्या लोकांच्या आक्रोशाला उत्तर देण्याची त्यांना जर गरज वाटत नसेल तर आता काय बोलावे हे समजत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा























