Covid cases : पश्चिम बंगालनं चिंता वाढवली, 24 तासांत 833 नव्या रुग्णांची भर
Corona Cases In West Bengal : दुर्गा पूजा उत्सवावेळी ऊसळलेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे.
Coronavirus Update In West Bengal : देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत असतानाच पश्चिम बंगालमधून (West Bengal) चिंता वाढवणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या समोर आली आहे. मागील 24 तासांत पश्चिम बंगालमध्ये नव्या 833 रुग्णांची भर पडली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमधील एकूण कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 646 इतकी झाली आहे. तर मृताची संख्या 19 हजार 21 इतकी झाली आहे. दुर्गा पूजा (Durga Puja) उत्सवावेळी ऊसळलेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
दुर्गा पूजावेळी झालेल्या गर्दीत अनेक लोकांच्या तोंडावर मास्क नव्हते. कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पश्चिम बंगालचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे. सध्या पश्चिम बंगलचा पॉझिटिव्हिटी रेट 2.52 इतका झाला आहे. राज्यात मागील 24 तासांत 775 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 753 इतकी झाली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील 15.57 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं सुरु आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या डोसनंतरही कोरोना झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस (Corona Vaccine Second Dose) घेतल्यानंतरही बुधवारी पश्चिम बंगालमध्ये 163 जणांना कोरोनाची लागण झाली. लसीकरण झाल्यानंतरही मास्क न वापरल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
संबधित बातम्या :
Corona vaccination : ऐतिहासिक...विक्रमी...! देशात लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला
दरम्यान, देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.