(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona vaccination : ऐतिहासिक...विक्रमी...! देशात लसीकरणाने 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला
Corona vaccination : 16 जानेवारी 2021 रोजी देशात पहिला डोस देण्यात आला होता. आता देशातील लसीकरणाने 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. त्यावेळी संपूर्ण देशाचं लसीकरण करायला अनेक वर्षे जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातील सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळेल का नाही अशीही शंका व्यक्त केली जात होती. पण या सर्वावर मात करत देशाने कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि देशवासियांच्या सहकार्यामुळे ही गोष्ट साध्य झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. लसीकरणाच्या बाबतीत भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.
Congratulations India! We are 100 Crores strong against #COVID19 ! #VaccineCentury #COVIDGroundZero #TyoharonKeRangCABKeSang @PMOIndia @mansukhmandviya @ianuragthakur @DrBharatippawar @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB @ICMRDELHI @DDNewslive @airnewsalerts pic.twitter.com/YvmnMGafIO
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 21, 2021
100 कोटी लसीकरणाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगाखान पॅलेस आणि मुंबईतल्या सीएसएमटीला रोषणाई करण्यात आली आहे.
देशातील लसीकरणाचे टप्पे कसे पार पडले?
- 16 जानेवारी 2021- लसीकरण सुरु
- 1 फेब्रुवारी 2021- 1 कोटी डोस
- 15 जून 2021 - 25 कोटी डोस
- 6 ऑगस्ट 2021 - 50 कोटी डोस
- 1 सप्टेंबर 2021- 75 कोटी डोस
- 21 ऑक्टोबर - 100 कोटी डोस
देशातील लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याचं यश साजरं करण्यासाठी गायक कैलाश खेर यांच्या आवाजात एक थीम सॉंग लाँच केलं जात आहे. आता हे थीम साँग देशभरातील सार्वजनिक ठिकाणी जसं की रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळ, बस स्टँडवर ऐकायला मिळणार आहे. या थीम साँगबद्दल बोलताना गायक कैलास खेर म्हणाले की, "लसीबाबत देशातील अनेक नागरिकांमध्ये अजूनही निरक्षरता आणि चुकीची माहिती आहे. या थीम साँगच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल."