(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Forecast : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा, या भागात पावसाची शक्यता; वाचा वेदर रिपोर्ट
Maharashtra Weather Forecast Today : भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून उन्हाच्या झळा (Heat Wave) सोसत असणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai Weather) आजही दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आजही मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. मागील आठवड्यांप्रमाणे हा आठवडा कोरडा आणि उष्ण असणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान कमी होण्यास थोडासा दिलासा मिळू शकेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रात या आठवड्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे.
आजचं हवामान कसं असेल?
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात हवामान कसं राहिल?
राज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा 5-6 डिग्री सेल्सिअस वाढणे अपेक्षित आहे. मुंबईतील चेंबूर आणि पवई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, येथे तापमान 37 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढू शकते. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवसांत स्थानिक कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने (IMD) आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. 4 आणि 5 मे रोजी कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या भागांमध्ये उष्णतेची लाट
पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. 5 मे रोजी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छ, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अंतर्गत कर्नाटक या भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
अशी घ्या स्वत:ची काळजी
नागरिकांनी हलके आणि सैल कपडे घालण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्वचा ओली ठेवा आणि थंड शॉवर घ्या. अति उष्णतेच्या दिवसांमध्ये हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे, म्हणून पुरेसे पाणी पिण्याची आणि घराबाहेर जास्त शारीरिक हालचाली टाळण्याचं आवाहनही केलं आहे.
या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 5 आणि 6 मे 2024 रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयात 5 आणि 6 मे 2024 रोजी वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 मे रोजी अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :