(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साडी नेसल्यामुळं रेस्टॉरंटनं महिलेला प्रवेश नाकारला, लेखिकेनं ट्वीट केलेला व्हिडीओ चर्चेत
साडी नेसल्यामुळं रेस्टॉरंटनं महिलेला प्रवेश नाकारला. पुण्यातील लेखिकेनं हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध लेखिका आणि वक्त्या शेफाली वैद्य यांची एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना शेफाली वैद्य यांनी लिहिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडीओ एका भारतातील रेस्टॉरंटमधील आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, साडी नेसल्यामुळं एका महिलेला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली.
व्हायरल व्हिडीओमध्ये साडी परिधान केल्यामुळं महिलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकरण्यात आला. त्यावरुन महिला आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये वादही होत असल्याचं दिसत आहे. शेफाली यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं की, "हे कोणी ठरवलं की, साडी 'स्मार्ट वेअर' नाही? मी यूएस, यूएई सोबतच यूकेमधील सर्वात उत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेले होते. तिथे मला कोणीच थांबवलं नाही. आणि हे रेस्टॉरंट भारतात एक ड्रेस कोड ठरवतंय आणि स्वतःच ठरवतंय की, साडी 'स्मार्ट वेअर' नाही? हे विचित्र आहे."
दरम्यान, सोशल मीडियावर शेफाली वैद्य आपल्या साड्या आणि भारतीय पारंपारिक वेशभूषा यासंदर्भातील माहिती शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. गेल्याच महिन्यात त्यांना वस्त्र उद्योग मंत्रालयाद्वारे गठित करण्यात आलेल्या एक विशेष समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.
अनिता चौधरी नावाच्या एका महिलेनं हा व्हिडीओ ट्वीट करत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महिला आयोगालाही टॅग केलं आहे. यासोबतच या महिलेनं एक प्रश्नही उपस्थित केला आहे. महिलेनं गृहमंत्री अमित शाह आणि महिला आयोगाला विचारलंय की, आता आम्ही साडी नेसणंही सोडलं पाहिजे का?