दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल, कोटातल्या विद्यार्थ्यांप्रमाणे मदतीची सरकारकडे विनंती
यूपीएससीची परीक्षा ही देशातल्या सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. सध्या लॉकडाऊनच्या काळात तर या परीक्षेसाठी दिल्लीत आलेल्या मराठी विद्यार्थ्यांचे दुहेरी हाल सुरु आहेत. राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरकार धावलं, तशीच मदत आम्हालाही मिळावी अशी मागणी हे विद्यार्थी सरकारकडे करत आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीत यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पूर्वपरीक्षा 31 मे रोजीच होणार की पुढे जाणार याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. 3 मे नंतर स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं सरकारने म्हटलं आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याचे, राहण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत.
यूपीएससीच्या परीक्षांचा कार्यक्रम वर्षभर आधीच जाहीर होत असतो. यंदाची पूर्वपरीक्षा 31 मे रोजी जाहीर करण्यात आली होती. पण 24 मार्चला देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर या परीक्षेचं भवितव्य अधांतरी आहे. 3 मे नंतर स्थितीचा आढावा घेऊन निर्णय जाहीर करु असं आयोगाने म्हटलं आहे. एरव्ही परीक्षेच्या एक महिनाभर आधी मुलांना प्रवेशपत्र मिळायला सुरुवात होते. पण अद्याप त्याचीही काही हालचाल दिसत नाही. त्यात डीओपीटी खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलली जाणार का अशीही चर्चा सुरु झाली आहे.
दिल्लीत येऊन यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राजेंद्रनगर तर या मराठी मुलांच्या उपस्थितीनेच ओळखलं जातं. यातल्या अनेक मुलांनी यूपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी केंद्र दिल्लीच दिलं होतं. त्यामुळे मार्चमध्ये लॉकडाऊनची हालचाल सुरु झाल्यानंतरही त्यांनी इथंच राहणं पसंत केलं होतं. तेव्हा लॉकडाऊन किती काळ चालणार याची काही कल्पना नव्हती. पण आता हे चक्र वाढत चालल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
एकीकडे परीक्षा अधांतरी तर दुसरीकडे लॉकडाऊनमधल्या समस्या यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. राजस्थानमधल्या कोटामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सोडण्यात आल्या, तशाच आमच्यासाठीही द्या अशी मागणी ते करत आहेत.
एका एका रुममध्ये चार चार विद्यार्थी दाटीवाटीने राहतात, शिवाय जवळच्या मेसही बंद झाल्या आहेत. घरमालकांना भाडंही भरावंच लागत आहे. अशा सगळ्या स्थितीत हे विद्यार्थी परराज्यात अडकून पडले आहेत.
3 मे नंतर लॉकडाऊन थोडासा शिथील होईल असं गृहीत धरलं तरी अनेक राज्यांत मोठी शहरंच सर्वाधिक प्रभावित आहेत. यूपीएससी परीक्षेसाठी प्रत्येक राज्यातली मोठी शहरंच केंद्र असतात. त्यामुळे आता परीक्षेबाबत नेमका काय निर्णय होतो, आणि महाराष्ट्रातल्या या मराठी विद्यार्थ्यांच्या मदतीला राज्य सरकार धावून येतं का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Lockdown 2 | UPSC Examची तयारी करणारे विद्यार्थी दिल्लीत अडकले