Piyush Goyal on Thackeray : उद्धव ठाकरेंनी केंद्राला राजकारणाचे डोस देणं थांबवून राज्याची जबाबदारी घ्यावी : पीयुष गोयल
महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत केंद्राचा अडथळा असल्याचा गंभीर आरोप राज्य सरकारने केला आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्वीट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
काय म्हणाले पीयुष गोयल?
ऑक्सिजनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले. भारत सरकार सर्व भागधारकांसह, भारतात जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन सुनिश्चित करत आहे. आम्ही सध्या 110% ऑक्सिजन उत्पादन क्षमता तयार करीत आहोत आणि उपलब्ध सर्व ऑक्सिजन औद्योगिक वापरापासून वैद्यकीय वापराकडे वळवित आहोत. देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी केंद्र सरकार दररोज राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे. कालच पंतप्रधानांनी आपल्या आढावा बैठकीत सांगितले की या संकटात केंद्र व राज्यांनी सहकार्याने काम केलं पाहिजे.
Saddened to see @OfficeOfUT’s gimmicks on oxygen. GoI, with all stakeholders, is ensuring maximum oxygen production in India. We are currently producing 110% of Oxygen generating capacity and diverting all available Oxygen from industrial use to medical use.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
राजकारणाचे रोजचे डोस देणं थांबवावं : गोयल
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून क्षुल्लक राजकारणाचे खेळ पाहून आश्चर्यचकित आणि दु: खी झालो. त्यांनी राजकारणाचे रोजचे डोस देणं थांबवून जबाबदारी घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सध्या अपंग व भ्रष्ट सरकारचा त्रास सहन करीत आहे आणि केंद्र जनतेसाठी चांगले प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील लोक ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ कर्तव्यदक्षपणे अनुसरण करीत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी ‘माझं राज्य, माझी जबाबदारी’ या भावनेने कर्तव्य बजावावे.
तर कंपन्या सील करु; नवाब मलिक यांचा इशारा
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्र शासनानं सांगूनही औषधांचा पुरवठा करण्यात आलेला नाही. केंद्रानं यासंबंधीचे निर्देश दिले असून, महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु असा इशाराही दिला आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला.
केंद्रानं ही काय परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे हा थेट सवाल उपस्थित करत, या औषधांच्या विक्रिला परवानगी द्या नाहीतर महाराष्ट्राच्या भूमीवर असणाऱ्या या औषधांच्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत एफडीएच्या मंत्र्यांच्या मदतीने पावलं उचलत कारवाई करत कंपन्या सील करु आणि औषधांचा जनतेला पुरवठा करु असा थेट इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबतही केंद्राचा अडथळा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देशातील परिस्थितीचा आढावा घेत ही युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला कामाला लावणं अपेक्षित होतं, पण देशाचे पंतप्रधान मात्र निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते.