Assam Boat Collision: आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींमध्ये टक्कर, 50 लोकांना वाचवण्यात यश, 70 जण अजूनही बेपत्ता
Assam Boat Collision: एनडीआरएफचे (NDRF) डेप्युटी कमांडंट पी. श्रीवास्तव म्हणाले की, राज्य अहवालानुसार, आतापर्यंत 50 लोकांना वाचवण्यात आले आहे तर 70 लोक बेपत्ता आहेत.
Assam Boat Collision: बुधवारी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची टक्कर झाली. या दोन्ही बोटींमध्ये सुमारे 120 लोक होते. एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट पी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, राज्य अहवालानुसार आतापर्यंत 50 लोकांना वाचवण्यात आले आहे, तर 70 लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर जोरहाटच्या एसपींनी एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मपुत्रा नदीतील अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.
मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी तातडीने बचाव करण्याच्या सूचना दिल्या
बोट दुर्घटनेच्या बातमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आणि तातडीने बचाव करण्याच्या सूचना दिल्या. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी जोरहाटमधील निम्तीजवळ बोट अपघाताला दुजोरा देताना दु:खद घटना असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, की राज्यमंत्री बिमल बोराह यांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की मी सुद्धा उद्या निम्ती घाटावर जाईन.
I am pained at the tragic boat accident near Nimati Ghat, Jorhat.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) September 8, 2021
Directed Majuli & Jorhat admin to undertake rescue mission expeditiously with help of @NDRFHQ & SDRF. Advising Min @BimalBorahbjp to immediately rush to the accident site. I'll also visit Nimati Ghat tomorrow.
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की मजूली आणि जोरहाट प्रशासनांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (National Disaster Relief Force) आणि राज्य आपत्ती निवारण दल (State Disaster Relief Force)यांच्या मदतीने त्यांचे बचाव अभियान अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरहाटच्या निम्तीघाट येथे बोटीच्या अपघाताबद्दल फोन करून चौकशी केली आणि आतापर्यंत बचावलेल्यांच्या स्थितीबद्दल अपडेट घेतले. ते (गृहमंत्री अमित शाह) म्हणाले की, केंद्र सरकार सर्व शक्य मदत देण्यासाठी तयार आहे.