Karnataka CM : कर्नाटकात मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह तीन उपमुख्यमंत्री घेणार शपथ, जाणून घ्या राजकीय गणितं
मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह कर्नाटकमध्ये तीन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आर अशोक, गोविंद करजोल, श्रीरामालु हे तीन नेते उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती आहे.
Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान कोणाकडे जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह कर्नाटकमध्ये तीन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आर अशोक, गोविंद करजोल, श्रीरामालु हे तीन नेते उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती आहे. आर अशोक हे वोक्कालिंगा समाजातून येतात तर गोविंद करजोल हे एससी समाजातून येतात. तर येडियुरप्पा सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री असलेले श्रीरामालु हे एसटी समाजातून येतात. या तिघांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपनं जातीय गणितं देखील साधली आहेत.
कर्नाटक भाजप नेते आणि प्रभारी अरुण सिंह यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटलं की, हा निर्णय सर्व आमदारांच्या सर्व संमतीनं घेतला आहे. बोम्मई यांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. आता हे चांगले मुख्यमंत्री म्हणून देखील काम करतील.
बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या जवळचे आणि लिंगायत समाजाचे आहे. मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर बोम्मई म्हणाले, ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे गरीबांसाठी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला मुख्यमंत्री पद मिळेल याचा विचार कधी केला नव्हता. परंतु मला माझ्या कष्टावर पुर्ण विश्वास होता आणि आज त्याचे फळ मला मिळाले.
मुख्यमंत्री पदासाठी झालेल्या बैठकीत बी. एस. येडियुरप्पा, भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी किशन रेड्डी उपस्थित होते. येडियुरप्पा यांनी काल (26 जुलै) मुख्यमंत्रीपदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. कार्यकाळा पूर्ण केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपविला.
भाजपच्या हायकमांडनं त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला असल्याचं बोललं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी या वृत्ताबाबत बोलताना मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी नकार दिला होता. 2023 मध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. येडियुरप्पा यांचं सध्याचं वय लक्षात घेत नेतृत्त्वबदल करण्याचा निर्णय भाजपच्या हायकमांडनं घेतला असल्याची माहिती मिळत आहे. 2023 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बसवराज बोम्मई यांच्या नावची घोषणा करण्यात आली आहे.