रामपूरच्या नवाबाच्या संपत्तीचं 16 वारसदारांमध्ये वाटप होणार, नवाब घराण्याची संपत्ती किती?
उत्तर प्रदेशातील रामपूरच्या नवाब राजघराण्याच्या संपत्तींचं वाटप 16 वारसदारांमध्ये होणार आहे. या घराण्याची एकूण संपत्ती 2600 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. संपत्ती वाटपाची ही प्रक्रिया डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूरच्या नवाब घराण्याच्या संपत्तीचं मूल्यांकन आणि सर्व्हे पूर्ण झाला आहे. राजघराण्याच्या हजारो कोटींच्या संपत्तीच्या वाटपाबाबत 45 वर्षांचा मोठा कायदेशीर लढा सुरु होता. अखेर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने यावर निकाल दिला. नवाब घराण्याच्या स्थावर आणि जंगम अशा दोन्ही प्रकराच्या संपत्तींची किमत कोट्यवधींमध्ये नाही तर अब्जावधींमध्ये झालं आहे. या राजघराण्याची एकूण संपत्ती 26.25 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. आता या संपत्तीचं 16 वारसदारांमध्ये वाटप होणार आहे.
नवाब घराण्याच्या संपत्तीच्या वाटपातील एक पक्षकार नवाब मुराद मियां आहेत तर दुसरे पक्षकार नवाब काजिम अली खान आहेत. दोन्ही पक्षकारांनी संपत्तीच्या वाटणीसाठी कोर्टाचं दार ठोठावलं होतं. ही संपत्ती स्वर्गीय मुर्जता अली खान यांची कन्या निखत बी, पुत्र मुराद मियां आणि दुसऱ्या पक्षाचे स्वर्गीय मिक्की मियां यांची पत्नी माजी खासदार बेगर नूरबानो, त्यांचा पुत्र नावेद मियां आणि मुलींसह एकूण 16 जणांमध्ये वाटली जाणार आहे.
16 वारसदारांमध्ये संपत्तीचं वाटप सर्वेक्षण आणि मूल्यांकनामध्ये राजघराण्याची एकूण संपत्ती सव्वीसशे कोटींपेक्षा जास्त आहे. या संपत्तीचं वाटप आता शरीयतनुसार दंडाधिकाऱ्यांमार्फत केलं जाईल. ही प्रक्रिया डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण केली जाईल. रामपूरच्या राजघराण्याच्या संपत्तीवर सुरुवातीला 18 वारसदारांनी दावा केला होता, पण त्यापैकी दोघांचं निध झालं आणि त्यांचे कोणीही वारस नव्हते. त्यामुळे आता संपत्तीची वाटणी 16 जणांमध्येच केली जाणार आहे. नवाबच्या संपत्तीमध्ये खासबाग कोठी, बेनजीर बाग, नवाब रेल्वे स्टेशन, सरकारी कुंडा आणि शाहबादच्या लखी बाग इत्यादीचा समावेश आहे. याशिवाय दागिने आणि शस्त्र देखील आहेत.
आजच्या हिशेबाने नवाबची संपत्ती किती? राजघराणाच्या स्थावर संपत्तीच्या सर्व्हे आणि मूल्यांकनानुसार खासबाग पॅलेस 350 एकर जमिनीवर आहे. बनेजीर कोठी आणि बाग 100 एकर जमिनीवर आहे. तर शाहबाद महल 250 एकर, कुंडा बाग 1200 चौरस मीटर आणि नवाबाचं खासगी रेल्वे स्टेशन 19,000 चौरस मीटरमध्ये बनलेलं आहे. नवाबच्या संपत्तीची किंमत आताच्या दरानुसार 2600 कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी खासबाग पॅलेसची किंमत 14 अब्ज 8 कोटी 55 लाख 500 रुपेय आहे. बेनजीर बागेची किंमत 2 अब्ज 99 कोटी 22 लाख 79 हजार 776 रुपये आहे. नवाब रेल्वे स्टेशनची कीमत एक अब्ज 13 कोटी 88 हजार रुपये आहे तर कुंडा जमीन, बाग इत्यादी 19 कोटी 21 लाख 89 हजार 441 रुपये आहे. याशिवाय जंगम मालमत्तेमझ्ये अनेक विंटेज कार, ट्रक, सिंहासन, सोन्याचे सिगरेट केस, मूर्ती आणि अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, ज्यांची किंमत आजच्या हिशेबाने 64.50 कोटी रुपये आहे. अशाप्रकारे रामपूरच्या नवाबाची एकूण संपत्ती 26 अब्ज 25 कोटी 89 लाख 71 हजार 321 रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
वारसदाराचं वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य नवाब घराण्यातील ज्या लोकांचा संपत्तीत हक्क मिळणार आहे, त्यापैकी बेगम नूरबानो, नवाब काजिम अली खान हे रामपूरमध्ये राहतात. पण तलत फातिमा हसन, पत्नी कामिल हसन कॅलिफोर्नियामध्ये राहतात. समन अली खान उर्फ समन खान महाराष्ट्रात राहतात. सय्यद सिराजुल हसन बंगळुरुत तर गिजाला मारिया या जर्मनीत राहतात. घराण्यातील इतर लोक जसे की सबा दिल्ली, सय्यद शुजात हुसैन बंगळुरु, सय्यदा बिजरीस बेगम दिल्ली, सय्यदा अख्तर लका बेगम लखनौ, सय्यदा कमर लाका बेगम बंगळुरुत राहतात. तर गिसेला मारिया अली खान जर्मनी, सय्यद रजा अडरेव्स अली खान जर्मनी, सय्यद नदीम अली खान जर्मनी, एमआर खान मेरीलॅण्डमध्ये राहतात. संपत्तीचा एक वाटा कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टीलाही मिळेल, कारण यांचे काही लोक पाकिस्तानात गेले होते.