Swati Maliwal Case Video: उचलून फेकून द्या... तुमच्या नोकऱ्या जातील... ए XXX; स्वाती मालीवाल प्रकरणी पहिला व्हिडीओ समोर
Swati Maliwal Case Video: आम आदमी पार्टी (AAP) च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल प्रकरणात 13 मे रोजीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमारही दिसत आहेत.
Swati Maliwal Case Video: नवी दिल्ली : आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याप्रकरणी एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ 13 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एबीपी माझा या व्हिडीओची पुष्टी करत नाही.
आम आदमी पार्टी (AAP) च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल प्रकरणात 13 मे रोजीचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमारही दिसत आहेत. सुरक्षा रक्षक स्वाती यांच्यासोबत बोलत आहेत. यामध्ये स्वाती मालीवाल आरडाओरडा करतानाही दिसत आहेत. सर्वांना धडा शिकवीन, तुमची नोकरीही जाईल, असं त्या म्हणत आहेत. त्यासोबतच स्वाति मालीवाल विभव कुमार यांना उद्देशून अपशब्दही उच्चारल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?
व्हिडीओमध्ये दिसतंय की, स्वाती मालीवाल सीएम हाऊसमध्ये बसल्या आहेत, जिथे काही कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगतात. यादरम्यान त्यांना विभव कुमार यांचा राग आला. आज मी या सगळ्या लोकांना सांगेन तुम्हाला जे हवं ते करा, तुमच्या नोकऱ्याही जातील... तुम्ही मला आत्ताच डीसीपींशी बोलू द्या. मी आधी SHO सिव्हिल लाईन्सशी बोलेन. जे होईल ते इथेच होईल. तू मला हात लावलास तर तुला तुझी नोकरी गमवावी लागेल.
यावेळी तिथे उपस्थित कर्मचारी स्वाती यांच्या वारंवार विनवण्या करताना दिसत आहेत. यावर स्वाती म्हणाल्या की, "मी आत्ताच 112 वर फोन केला आहे, पोलीस येऊ द्या, मग बोलू. यावर कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की, "बाहेरही पोलीस येतील, इथे येणार नाहीत का?" स्वाती म्हणाल्या नाही, "आता जे होईल ते आतमध्येच होईल, ते आत येतील. जेव्हा कर्मचाऱ्यांनी स्वातीला बाहेर येण्याची विनंती केली तेव्हा ती म्हणाली, "मला उचलून फेकून द्या... तुम्ही फेका.. हा टकला XXX..."
व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलीस 'अॅक्शन मोड'मध्ये
दिल्ली पोलिसांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे. हा व्हिडीओ कोणी बनवला आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी इतर व्हिडीओही बनवले आहेत का? याची माहिती घेतली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. हा व्हिडीओ काही सेकंदांचा असून, तिथे उपस्थित असलेल्या लोकांची चौकशी केली जाईल, असंही पोलिसांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.