(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Snooping Case: हेरगिरी प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्याविरोधात CBI कडून FIR दाखल
Snooping Case: एफआयआरनुसार, फीडबॅक युनिट प्रकरणात सिसोदिया यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Snooping Case : सीबीआयने (CBI) दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरुद्ध हेरगिरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, फीडबॅक युनिट प्रकरणात सिसोदिया यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक केली होती.
सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध हेरगिरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, फीडबॅक युनिट प्रकरणात सिसोदिया यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तत्कालीन विजिलेंस सेक्रेटरी सुकेश कुमार जैन, सेवानिवृत्त डीआयजी, सीआयएसएफ, मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार आणि सहसंचालक फीडबॅक युनिट, निवृत्त सहसंचालक प्रदीप कुमार पुंज (उपसंचालक एफबीयू), सेवानिवृत्त असिस्टंट कमांडंट सीआयएसएफ सतीश खेत्रपाल (फीडबॅक अधिकारी), गोपाल मोहन (दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिसोदियांविरुद्ध खटला चालवण्यास सीबीआयला मान्यता
8 फेब्रुवारी रोजी, सीबीआय फीडबॅक युनिटच्या कथित हेरगिरी प्रकरणात, केंद्रीय गृह मंत्रालयाने आप नेत्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय तपास यंत्रणेला सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास मंजुरी दिली होती. तेव्हापासून मनीष सिसोदिया यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता होती. अखेर आज याप्रकरणी सिसोदिया यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.
प्रकरण नेमकं काय?
दिल्लीत 'आप'ची सत्ता आल्यानंतर या विभागांतर्गत फीडबॅक युनिटची स्थापना करण्यात आली. या युनिटवर हेरगिरीचा आरोप आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, एफबीयूने 1 फेब्रुवारी 2016 रोजी 17 कंत्राटी कामगारांसह काम सुरु केलं. यापैकी बहुतांश इंटेलिजन्स ब्युरो आणि केंद्रीय निमलष्करी दलातील निवृत्त अधिकारी होते. विविध मंत्रालयं, विरोधी राजकीय पक्ष, संस्था आणि व्यक्ती यांच्यावर हेरगिरी करण्याचा या युनिटचा हेतू असल्याचं बोललं जात आहे.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आधीपासूनच अटकेत आहेत सिसोदिया
दरम्यान मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी अर्थ आणि महसूलमंत्री मनीष सिसोदिया यांना 'सीबीआय'ने यापूर्वीच अटक केली होती. 'आप' सरकारने उत्पादन शुल्क धोरणात बदल करताना घाऊक मद्यविक्रेत्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या मोबदल्यात 100 कोटींची लाच घेतल्याचा संशय असून या प्रकरणी 'ईडी'चीही समांतर चौकशी सुरु आहे. 'ईडी'ने सिसोदियांना गुरुवारी रात्री अटक केली. सध्या सिसोदिया तिहार तुरुंगात असून 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.