Shivaraj Patil: महाभारतातील जिहादवरून गदारोळ, शिवराज पाटील यांनी स्पष्टच सांगितले
Shivaraj Patil: महाभारतात जिहाद असल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय गदारोळ झाल्यानंतर आज माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी वादावर भूमिका स्पष्ट केली आहे.
![Shivaraj Patil: महाभारतातील जिहादवरून गदारोळ, शिवराज पाटील यांनी स्पष्टच सांगितले shivaraj patil explanation on controversial comments comparing mahabharat and jihad Shivaraj Patil: महाभारतातील जिहादवरून गदारोळ, शिवराज पाटील यांनी स्पष्टच सांगितले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/21/b734e21e5e53bf5eae875522873b4bae1666341967901290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivaraj Patil: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (Shivraj Patil) यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादसोबत केल्याचा दावा करत राजकीय वाद निर्माण झाला. गुरुवारी केलेल्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत विरोधक वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे म्हटले. आपण उपस्थितांना काही प्रश्न विचारले होते, असेही त्यांनी म्हटले.
शिवराज पाटील यांनी म्हटले की, चांगल्या गोष्टींसाठी, माणसाच्या संरक्षणासाठी कोणी शस्त्र उचलले तर त्याला जिहाद म्हणता येणार नाही. महाभारतात दुर्योधनाने जे कृत्य केले त्याला जिहाद असे म्हणू शकता. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धापासून पळ न काढता त्याला सामोरे जाण्यास सांगितले. हा जिहाद नव्हता. लढाई, युद्ध सगळ्याच देशांमध्ये, धार्मिक ग्रंथात असल्याचे त्यांनी म्हटले.
जिहादबाबत बोलताना शिवराज पाटील यांनी म्हटले की, तुम्ही कुराण वाचले का? कुराणानुसार, देव एक आहे. त्याला रंगरुप, आकार नाही. ज्यू आणि ख्रिश्चनांमध्येदेखील असेच म्हटले जाते. हिंदूच्या जुन्या ग्रंथातही याबाबत नमूद करण्यात आल्याच त्यांनी म्हटले. लढाई, युद्ध सगळ्या देशांमध्ये आहे. महाभारत, रामायणात युद्ध आहे. पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध झाले. युद्ध तुम्हाला काही प्रमाणात काही करावे लागते, असेही त्यांनी सांगितले.
वेळेप्रसंगी युद्ध करावेच लागते.
जिहाद आणि युद्धाची संकल्पना वेगळी असल्याचे शिवराज पाटील यांनी स्पष्ट करताना सांगितले की, जिहाद म्हणजे स्वार्थासाठी केलेले युद्ध आहे. तर, युद्ध हे संरक्षणासाठी, योग्य कारणांसाठी केले जाते. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले की, तू लढ, कर्तव्यापासून दूर पळून न जाण्यास सांगितले, याला तुम्ही जिहाद म्हणणार का, असा उलट प्रश्न त्यांनी केला.
सरसंघचालकही भाष्य करणार नाहीत
शिवराज पाटील यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा माझ्या या विधानावर अद्याप बोलले नाहीत. ते बोलतील असं वाटत नाही. मला काय म्हणायचे आहे, ते आधी समजून घेतील. गावातील भाजपचे नेते काय बोलतात याला महत्त्व देत नसल्याचे पाटील यांनी म्हटले.
काय म्हणाले होते शिवराज पाटील?
शिवराज पाटील यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. ते म्हणाले की, "मनामध्ये कोणतीही संशय नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे."
पाहा व्हिडिओ: Shivraj Patil clarifies On jihad : जिहादवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवराज पाटील याचं स्पष्टीकरण : ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)