(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जास्त मदतीची मागणी, संसद भवन परिसरात शिवसेना खासदारांचं आंदोलन
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे खासदार सरकारविरोधी भूमिकेत दिसले. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्त मदतीची मागणी शिवसेना खासदारांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं.
नवी दिल्ली : दिल्लीतील संसद भवन परिसरात शिवसेना खासदारांनी आज आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत शिवसैनिकांनी निदर्शनं केली. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शिवसेनेने यावेळी केला. त्यामुळे आता केंद्राने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून होत आहे.
भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर आक्रमक दिसत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे खासदार सरकारविरोधी भूमिकेत दिसले. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांना शेकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत कमी असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेना खासदारांची आहे. राज्यपालांनी दोन हेक्टरपर्यंतच्या खरीप पिकांसाठी 8 हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित केली आहे.
याशिवाय शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयक विरोधात आहे. पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या नागरिकांना नागरिकत्व देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, जैन निर्वासितांना भारताचं नागरिकत्व बहाल करणारं हे विधेयक आहे.
शिवसेना विरोधी बाकांवर बसणार
शिवसेना आता सरकारचा नाही तर विरोधी पक्षाचा भाग असेल, अशी घोषणा केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल केली. विरोधी पक्षात असल्याने आता शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील आसन व्यवस्थेतही बदल होणार आहेत. शिवसेनेच्या मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही शिवसेनेचे खासदार उपस्थित नाहीत. त्यामुळे सरकारचा भाग नसल्याने त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे, असं प्रल्हाद जोशींनी सांगितलं.
संबंधित बातम्या