शिवसेना अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर, भाजपकडून घोषणा; सेनेचे खासदार आता विरोधी बाकांवर बसणार
शिवसेना अखेर एनडीएमधून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. खुद्द भाजपकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतची माहिती दिली.
नवी दिल्ली : शिवसेना आता सरकारचा नाही तर विरोधी पक्षाचा भाग असेल, अशी घोषणा भाजपने केली आहे. त्यामुळे शिवसेना अखेर एनडीएमधून अधिकृतरित्या बाहेर पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षात असल्याने आता शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील आसन व्यवस्थेतही बदल होणार आहेत. आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे शिवसेनेनं आधीच स्पष्ट केलं होतं. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये राज्यात असलेली दरी आता राष्ट्रीय पातळीवरही दिसणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी एनडीएची बैठक बोलावली होती. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच आजच्या बैठकाला शिवसेनेचे खासदार जाणार नसल्याची माहिती दिली होती. मात्र भाजपने बैठकीला निमंत्रणच दिलं नसल्याचं शिवसेनेनं सांगितलं होतं. प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं की, शिवसेनेच्या मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही शिवसेनेचे खासदार उपस्थित नाहीत. त्यामुळे सरकारचा भाग नसल्याने त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे.
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यादरम्यान केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी तुम्ही युतीतून बाहेर का पडलात? असं त्यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी तुम्हाला जो अर्थ काढायचा तो काढा, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं. शिवसेनेने अद्याप युतीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली नव्हती.
राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाशिवआघाडी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. यासाठी तिन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. सत्तास्थापनेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
VIDEO | मी पुन्हा येईन, फडणवीसांच्या विरोधात घोषणाबाजी, शिवसैनिकांची घोषणाबाजी