(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : मायदेशात परतण्यासाठी कडाक्याच्या थंडीत चार दिवस उभा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने सांगितला युक्रेनमधील थरारक अनुभव
Russia Ukraine War : युक्रेनमधून मायदेशात परतण्यासाठी कडाक्याच्या थंडीत चार दिवस उभा राहावे लागले. यावेळी युक्रेन सैनिकांनी काही मुलांना मारहाण केल्याचे वाशीम येथील विद्यार्थ्याने सांगितलं आहे.
Russia Ukraine War : सलग चार दिवस रांगेत उभा राहिल्यानंतर युक्रेनमधून रोमानियामध्ये प्रवेश मिळाला. या चार दिवसांत झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी कोणतीही सुविधा नव्हती. युक्रेन-रोमानियाच्या सीमेवर प्रचंड थंडी आहे. परंतु, अशा कडाक्याच्या थंडीतही आम्ही मायदेशी परतण्यासाठी चार दिवस रांगेत उभा होतो, असा भयंकर अनुभव वाशीम येथील साबीर खान शब्बीर खान पठाण या विद्यार्थ्याने सांगितला आहे.
साबीर हा मेडिकलच्या शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला आहे. परंतु, रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे युक्रेनधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीयांनी मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये विमान उतरू शकत नसल्याने या नागिराकांना पोलंड, रोमानियासह शेजारील देशांमध्ये येण्यास सांगितले आहे. तेथून या विद्यार्थ्यांना भारतात आणले जात आहे. परंतु, युक्रेनमधून बाहेर पडण्याची परिस्थिती खूप भयावह आहे. एबीपी माझासोबत संवाद साधताना साबीर याने ही भयावह परिस्थिती सांगितली आहे.
"युक्रेन सोडून चार दिवस झाल्यानंतर आम्ही रोमानियामध्ये पोहोचलो असून तेथे आमच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. जेवढ्या लवकरात लवकर आम्हाला येथून मायदेशात घेऊन जाता येईल तेवढ्या लवकर घेऊन जावे, अशी विनवणी साबीर याने एबीपी माझासोबत बोलताना केली आहे.
साबीरने सांगितले की, "युक्रेनहून रोमानियाच्या सीमेवर पोहोचण्यासाठी मुलांना तब्बल 15 किलोमीटरची पायपीट करावी लागली. 15 किलोमीरची पायपीट केल्यानंतर रोमानियामध्ये प्रवेश करण्यासाठी चार दिवस रांगेत उभा राहावे लागले. सीमेवर पोहोचल्यानंतर अनेकांना भोवळ येत होती. खाण्यासाठी काहीही नव्हतं. सीमेवरील तापमान शुन्य अंशाच्या खाली आहे. संपूर्ण गोंधळात या मुलांनी आपले अर्धे साहित्य मागेच ठेवून दिले आहे. शेकडो भारतीय मुले रोमानियेच्या सीमेवर चार दिवस अडकली होती. गोळीबार झाल्यानंतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असत. त्यावेळी मुलांध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होत असे. परंतु, याच वेळी युक्रेन सैनिकांकडून मुलांना माहाण करण्यात येत असे. शिवाय सैनिकांकडून मुलींनाही त्रास दिला जात असे."
"युक्रेन मधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर खार्किव्ह असून येथील मराठी मुलांची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आज सकाळी सहा वाजता मुलांनी विद्यापीठ सोडले आहे. 15 किलोमीटर पायी चालत रणभूमीतून ही मुलं कशीबशी रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहेत. सुमारे दोन हजार मुलं सकाळपासून रेल्वे स्टेशनवर उभा आहेत. त्यांना युक्रेनियन नागरिक ट्रेनमध्ये चढू देत नाहीत. भारतीय दूतावासाने आज संध्याकाळी सहा वाजण्याच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शहर सोडायला सांगितलं आहे. परंतु, युक्रेनियन नागरिक ट्रेनमध्ये चढू देत नाहीत. ही मुलं आजूबाजूचे भीषण बॉम्बस्फोट ऐकत आहेत. सध्या ही मुलं रल्वे स्टेशनच्या खाली आश्रय घेऊन बसलेली आहेत. त्या ठिकाणी प्रचंड स्फोटांचे आवाज आणि गोळीबार सुरू आहेत," असा थरारक अनुभव साबीर याने सांगितला.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : युद्धामुळे महिला, मुलांचा परिस्थिती वाईट; शेजारच्या देशांत आश्रय घेण्यास भाग
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल