Karnataka Election Result 2023: "कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण..."; राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला
Karnataka Election Result 2023: प्रशांत किशोर म्हणाले की, 2013ची कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता.

Karnataka Election Result 2023: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी कर्नाटकातील (Karnataka) विजयाबाबत काँग्रेसला (Congress) सल्ला दिला आहे. ते सोमवारी (15 मे) म्हणाले की, कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण 2013 मध्येही कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा पराभव झाला होता.
13 मे रोजी आलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेसनं राज्यात जोरदार पुनरागमन केलं आहे. 224 सदस्यीय विधानसभेत पक्षानं 135 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपला केवळ 66 आणि जेडीएसला 19 जागा मिळाल्या आहेत. तर इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत.
सूरज यात्रेपासून दूर राहणार
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, त्यांना दुखापत झाली आहे, त्यामुळे ते बिहारमधील त्यांच्या 'जन सूरज' पदयात्रेपासून जवळपास महिनाभर दूर राहणार आहेत. त्यांनी समस्तीपूरमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितलं की, गांधी जयंतीला सुरू झालेली पदयात्रा आता सुमारे 15 दिवसांनी पुन्हा सुरू होऊ शकते. प्रशांत किशोर प्रकृती अस्वास्थामुळे यात्रेपासून दूर राहणार आहेत.
कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेसचं विचारमंथन
कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस मंथन करत आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतर काँग्रेसचे तीन निरीक्षक सोमवारी (15 मे) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
सोनिया गांधी, राहुल गांधींचा घेणार सल्ला
एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे आता अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सल्ला घेतील. यासोबतच येत्या 24 तासांत कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
दरम्यान, डीके शिवकुमार यांनी सिद्धरामय्या यांचं अभिनंदन केलं आहे. वास्तविक, एका पत्रकारानं विचारलं त्यावेळी सिद्धरामय्या म्हणाले आहेत की, त्यांच्यासोबत जास्त बहुमत आहे, यावर तुम्ही काय म्हणाल? डीके शिवकुमार म्हणाले की, मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. मी इथे बसलोय, माझं कर्तव्य बजावतोय.
मी एकटा म्हणजे बहुमत : डीके शिवकुमार
आपल्याकडे आमदारांचं बहुमत आहे असा क्लेम सिद्धारमय्या यांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना डीके शिवकुमार म्हणाले की, धाडस असलेला व्यक्ती एकटा बहुमत निर्माण करु शकतो. मी एकटा म्हणजे बहुमत आहे. माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना कर्नाटक जिंकून देण्याचं मी वचन दिलं होतं, ते मी पूर्ण केलं आहे.
गेल्या पाच वर्षामध्ये काय काय झालं हे मी जाहीर करणार नाही. माझ्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण संख्या असून ती नेमकी किती हे आता सांगत नाही असं डीके शिवकुमार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
