Statue of Equality : रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंचीचा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला करणार समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी 2.45 च्या सुमारास हैदराबादमधील पटट्णसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ करणार आहेत.
Statue of Equality : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उद्या म्हणजेच पाच फेब्रुवारी 2022 रोजी हैदराबादला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी 2.45 च्या सुमारास हैदराबादमधील पटट्णसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा आरंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 11व्या शतकातील भक्तीमार्गीय संत रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंच पुतळा (Statue of Equality) राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या खास तयार बोधचिन्हाचे अनावरण करतील आणि या सोहळ्याच्या संस्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करतील. या भेटीच्या सुरवातीलाच पंतप्रधान आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटीबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या ( इक्रीसॅट) 50 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला आरंभ करतील.
रामानुजाचार्य यांनी विश्वास, जात आणि वंश यासह जीवनाच्या कोणत्याही स्तरावर समतेच्या कल्पनेचा पुरस्कार केला. पंचधातू म्हणजे सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पंचधातूंनी रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंचीचा हा पुतळा साकार झाला आहे. हा बैठक स्थितीतील पुतळा जगात सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजिटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे. रामानुजाचार्य यांच्या पुतळ्य़ाची कल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे.
शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमात रामानुजाचार्य यांच्या जीवन आणि शिकवणूक यांच्यावर 3D सादरीकरण करण्यात येणार आहे. समतेच्या पुतळ्याभोवताली असलेल्या दिव्य देसम च्या 108 कोरीव मंदिरांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. रामानुजाचार्य यांनी राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात किंवा पंथ या सर्वांना समान मानून लोकांच्या उद्धारासाठी अथक कार्य केले आहे. समतेच्या पुतळ्याचे अनावरण हा बारा दिवस चालणाऱ्या रामानुजन सहस्त्राब्धी समारंभाचा एक भाग आहे. रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त हा सोहळा सध्या सुरू आहे.