(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price Hike : देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; तुमच्या शहरातील दर काय?
Petrol, Diesel Price : निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या पुढे आता रोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं काही विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय.
नवी दिल्ली : देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागलं आहे.
आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 90.74 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 81.12 रुपये प्रति लीटर इतकं झालं आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 97.12 रुपये प्रति लीटर झाली असून डिझेल 88.19 रुपये प्रति लीटर इतकं झालं आहे. चेन्नई मध्ये पेट्रोल 92.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.09 रुपये प्रति लीटर आहे. तर कोलकात्यातील दरांत वाढ होत, पेट्रोल 90.92 रुपये आणि डिझेल 83.98 रुपये प्रति लीटर लीटर इतकं झालं आहे.
निवडणुका संपताचं पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरु
निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2021 रोजी शेवटची इंधन दरवाढ झाली होती. 27 फेब्रुवारीनंतर देशात काल पहिल्यांदा इंधनाची दरवाढ करण्यात आली. मधल्या काळात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने इंधानांची किंमत 'जैसे थे' ठेवण्यात आली होती असं बोललं जात आहे.
स्थानिक कर (व्हॅट) आणि वाहतुकीच्या किंमतीनुसार देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत वेगळी आहे. तेल कंपन्यांनी 15 एप्रिलला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत थोडी कपात केली होती. या काळात संपूर्ण पश्चिम बंगालसह पाच राज्यांत निवडणूकीची प्रक्रिया चालू होती. मतदान संपताच तेल कंपन्यांनी इंधन दरवाढीचे संकेत दिले होते. कारण या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे सहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होतं. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.
निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. या पुढे आता रोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं काही विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.