एक्स्प्लोर
बैलांपासून वीजनिर्मिती... पतंजलीमध्ये संशोधन सुरु!

नवी दिल्ली : देशात अत्यंत वेगाने वाढणाऱ्या बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या 'पतंजली'मध्ये सध्या बैलांपासून वीजनिर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. बैलांच्या ताकदीचा सदुपयोग करत वीजनिर्मितीसाठी गेल्या दीड वर्षांपासून संशोधन सुरु आहे, त्यात सुरुवातीला यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. हिंदी वृत्तपत्र नवभारत टाईम्सने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्ण यांच्या कल्पनेवर या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये देशातील एक प्रमुख मल्टिनॅशनल मॅन्युफॅक्चरर आणि एका तुर्की कंपनीचाही समावेश आहे. एक प्रोटोटाईप डिझाईन तयार करण्यात आले असून, अधिक वीजनिर्मितीसाठी बदल करण्यात येत आहेत. या संशोधन प्रकल्पाची माहिती देणाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत एक टर्बाईन असणाऱ्या डिझाईनमधून जवळपास 2.5 किलव्हॅट वीज मिळू शकते. बैलांमधील ताकदीचा वापर करुन वीजनिर्मितीची ही कल्पना आहे. बैलांपासून वीजनिर्मितीवर हरिद्वारमध्ये पतंजलीच्या प्रयोगशाळेत संशोधन सुरु असल्याच्या वृत्ताला बालकृष्ण यांनीही दुजोरा दिला. "बैलांचा दिवसा शेतात आणि संध्याकाळी वीजनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो. प्राचीन काळात बैलांचा उपयोग शस्त्रांची ने-आण करण्यासाठी होत असे. त्यामुळे जर आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने बैलांच्या याच ताकदीचा वापर केला, तर आणखी चांगला उपयोग होऊ शकतो.", असेही बालकृष्ण यांनी सांगितले. ज्यांना महागडी वीज परवडत नाही, अशा जनतेसाठीही बैलांपासून वीजनिर्मिती महत्त्वाची ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा























