(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Power Crisis: रविवारी विजेची मागणी घटली, कोळशाचा पुरवठाही वाढला
Coal Crisis In India: वीज संकटाचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारसाठी रविवारचा दिवस काही प्रमाणात दिलासा देणारा ठरला आहे.
Coal Crisis In India: वीज संकटाचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारसाठी रविवारचा दिवस काही प्रमाणात दिलासा देणारा ठरला आहे. उष्णतेच्या प्रकोपाचा सामना करणाऱ्या देशातील काही भागांत उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. याचाच परिणाम विजेची मागणीत कमी झाल्याच्या रूपात दिसून येत आहे. दरम्यान, कोळशाचा साठा वाढावा यासाठी वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठाही जलदगतीने करण्यात येत आहे.
सरकारने 1 मे रोजी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी विजेची मागणी सुमारे 10 हजार मेगावॅटने कमी होती. आकडेवारीनुसार, 30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता देशभरात विजेची कमाल मागणी 203947 मेगावॅट होती, तर पीक आवरमध्ये (8 वाजता) ही मागणी 186950 मेगावॅट होती. त्याच वेळी 1 मे रोजी कमाल मागणी 191216 मेगावॅटपर्यंत खाली आली, तर पीक आवरमध्ये ही मागणी 177783 मेगावॅट होती. म्हणजेच 30 एप्रिलच्या तुलनेत 1 मे रोजी विजेची मागणी 10 हजार मेगावॅटने कमी होती. 30 एप्रिलला सर्वाधिक मागणी देशातील पश्चिम भागातून आली होती, जिथे 66736 मेगावॅटची नोंदणी झाली होती, तर 1 मे रोजीही पश्चिमेकडून 62626 मेगावॅटची मागणी आली होती.
यात दिलासादायक बाब म्हणजे 30 एप्रिल रोजी पीक आवरमध्ये विजेचा पुरवठा मागणीच्या तुलनेत 5816 मेगावॅटने कमी करण्यात आला आहे. तर 1 मे रोजी हा फरक केवळ 207 मेगावॅट इतका कमी झाला. रविवारी कार्यालयांना सुट्टी आणि काही भागात उष्मा कमी असल्यामुळे, ही कमतरता आली असावी असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे कोळशाच्या टंचाईचा सामना करत असलेल्या वीजनिर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोल इंडिया लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल महिन्यात वीज प्रकल्पांना 16% जास्त कोळसा पुरवठा करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये वीज प्रकल्पांना 4.97 कोटी टन कोळशाचा पुरवठा करण्यात आला, जो गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 67 लाख टनांनी वाढला आहे. दरम्यान, वीज केंद्रांना दररोज सुमारे 17 लाख टन कोळशाचा पुरवठा केला जात होता. कोल इंडियाच्या म्हणण्यानुसार यावर्षी एप्रिलमध्ये कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले आहे.