दिलासादायक! ओमिक्रॉनचा एकही रुग्ण भारतात नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
Mansukh Mandaviya On Omicron Case : दिलासादायक! ओमिक्रॉनचा एकही रुग्ण भारतात नाही; अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत दिली आहे.
Mansukh Mandaviya On Omicron Case : जगात दहशत माजवणाऱ्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. अशातच आज राज्यसभेत बोलताना देशात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही, अशी दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत दिली आहे. संशयास्पद रुग्ण आढळल्यास तातडीनं तपासणी केली जात असल्याचंही आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आजच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत बोलताना आरोग्यमंत्र्यांनी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा एकही रुग्ण नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, नवा व्हायरस जगभरातील 14 देशांमध्ये आढळून आला आहे. परंतु, भारतात आतापर्यंत ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. एखादा संशयित रुग्ण जरी आढळला तरी त्वरित त्याची चाचणी करुन जिनोम सिक्वेंसिंगही करण्याचे निर्देश देशभरात देण्यात आले आहेत.
देशातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट
भारतात कोरोनाच्या संसर्गाचा जोर कमी होत असल्याची परिस्थिती आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. नवीन कोरोनाबाधित आणि बाधितांच्या मृत्यू संख्येतही घट होत आहे. मागील 24 तासांत 6990 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 190 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांमध्ये 10 हजार 116 बाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. देशभरात सध्या एक लाख 543 कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भारतात आतापर्यंत 1 अब्ज 23 कोटी, 25 लाख, 2 हजार 767 कोविड लशीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन कोटी 40 लाख 18 हजार 299 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले. तर, चार लाख 68 हजार 980 लोकांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. कोविड चाचणीवरही भर देण्यात येत आहे. मागील 24 तासांमध्ये 10 लाख 12 हजार 523 जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
ओमिक्रॉननं धाकधुक वाढवली, केंद्र सरकारकडून सुधारीत गाईडलाईन्स जारी
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळल्यानंतर प्रत्येक देशांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे.
संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात येण्यासाठी प्रवास सुरु करण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना चाचणी करणं अनिर्वाय असणार आहे. तसेच भारतात विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना क्वॉरंटाइन केलं जाणार आहे. तसेच त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.