Mannerless CM of Delhi! अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपचं टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कोविड आढावा बैठकीमधील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (27 एप्रिल) देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. कोरोनाचे नवे व्हेरिएंटमुळे परिस्थिती कठीण होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. मात्र या बैठकीमधील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनावरुन भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीचा काही भाग ट्वीट करुन अरविंद केजरीवाल यांच्यावर 'शिष्टाचारहीन'तेचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खुर्चीला रेलून आणि मागे हात ठेवून आरामात बसलेले दिसले.
हा व्हिडीओ शेअर करताना भाजपने अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख 'दिल्लीचे असंस्कृत मुख्यमंत्री' असा केला आहे. व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही कंटाळलेले दिसले. नंतर आपले दोन्ही हात डोक्याच्या मागे घेत खुर्चीला रेलून आरामशीर मुद्रेत दिसत आहेत.
Mannerless CM of Delhi! pic.twitter.com/yswnLNI6Ty
— BJP Delhi (@BJP4Delhi) April 27, 2022
भाजपने दुपारी पावणे दोनच्या सुमारास व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी हे ट्वीट रिट्वीट करत अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान भाजपच्या आरोपांवर अद्याप आम आदमी पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली होती. यादरम्यान त्यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की, कोरोनाबाबत अजूनही सावध राहण्याची गरज आहे. ते म्हणाले की, ओमायक्रॉनसारखे व्हेरिएंटनी इतर देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत भारतातही याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे.