(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपसाठी 80 टक्के हिंदूच भारतीय, इतर धर्मीय देशातील पाहुणे; मणिशंकर अय्यर यांचा हल्लाबोल
Mani Shankar Aiyar काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. या देशातील हिंदूशिवाय इतर नागरिक भारतीय नाही असे भाजप नेत्यांना वाटत असल्याचे अय्यर यांनी म्हटले.
Manishankar Aiyar on BJP : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सत्तेत बसलेल्या लोकांसाठी फक्त 80 टक्के जनताच भारतीय आहे. इतर नागरिकांनी फक्त पाहुण्यांप्रमाणेच रहावे असे त्यांना वाटते असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले. आमच्यादृष्टीने या देशातील सर्वच नागरिक हे भारतीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदू आणि हिंदूत्वाच्या उल्लेखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्व हे भिन्न असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारसरणी देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
मणिशंकर अय्यर काय म्हणाले?
अय्यर यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी हिंदू धर्म आणि हिंदूत्व यामध्ये फरक असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला जोडूनच म्हणेल की, आम्ही हिंदू धर्मावर विश्वास ठेवतो. आम्ही 100 टक्के भारतीय आहोत. या देशातील सर्व नागरिक भारतीय आहेत. सत्तेत असलेल्यांच्या दृष्टीने 80 टक्के हिंदू धर्मीय हेच भारतीय आहेत. इतर भारतीय नाहीत.
भाजपवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, भाजपच्या दृष्टीने इतर धर्मीय हे भारतीय नाहीत. देशात त्यांनी फक्त पाहुणे म्हणूनच रहावे असे त्यांना वाटते. मनात येईल तेव्हा त्यांना या देशाबाहेर काढू. आमच्या धोरणांवर, मार्गावर त्यांनी वाटचाल करावी असे सत्तेत बसलेल्या लोकांना वाटत असल्याचे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले.
नेहरू यांनाच भारतातील विविधता खोलवर समजली
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीचे स्मरण करताना अय्यर यांनी म्हटले की, भारतातील विविधता जवाहरलाल नेहरू यांच्याशिवाय कोणालाच अधिक समजली नाही. भारतात अनेक भाषा आहेत. अनेक वर्ण आहेत, अनेक प्रकारचे साहित्य, भाषा, कविता आहेत. याची त्यांना अधिक जाणीव होती असेही अय्यर यांनी म्हटले.
वादाची सुरुवात कशी झाली?
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या एका पुस्तकात हिंदुत्ववाद्यांची तुलना बोको हराम, आयसिससोबत केली होती. खुर्शीद यांच्या पुस्तकातील वादावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले. काँग्रेस नेत्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व भिन्न असल्याचे म्हटले. तर, भाजपने काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेस हिंदू विरोधी असल्याचे म्हटले होते.