बहुमताचा मॅजिक फिगर हुकला, मोदींचे आंध्र प्रदेशकडे विशेष लक्ष; चंद्राबाबूंच्या जागा वाढल्या, पुढे काय?
भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे दिसून येत आहे, पण एनडीएने बहुमताचा मॅजिक फिगर गाठला आहे.
हैदराबाद: लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून देशातील काही राज्यात भाजपला चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. भाजपने सर्वाधिक सीट जिंकण्याचा दावा केलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यात भाजपा आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. तर, बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णामुळे निवडणूक चर्चेत आलेल्या कर्नाटक राज्यातही भाजपला फटका बसला आहे. आत्तापर्यंत आलेल्या आघाडीच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात भाजपपेक्षा इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, देशाच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच, एनडीएसोबत असलेल्या बिहारमधील नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या भूमिकेकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन चंद्राबाबू नायडूंचे अभिनंदन केले. त्यावर, नायडू यांनीही प्रतिक्रिया देत आभार मानले आहेत.
भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे दिसून येत आहे, पण एनडीएने बहुमताचा मॅजिक फिगर गाठला आहे. त्यामुळे, बहुमतासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच आता मोदींच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळेच, मोदींनी आंध्र प्रदेशातील विजयाबद्दल चंद्राबाबू नायडू यांचे अभिनंदन केले. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून एनडीएला 30 जागांवर आघाडी असून इंडिया आघाडीला 9 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येते. दरम्यान, नितीशकुमार यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते सम्राट चौधरी यांची भेट टाळल्यामुळे भाजपसोबत असलेल्या नितीश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेशमधील 25 जागांसाठी भाजपने येथील तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि पवनकल्याण यांना सोबत घेतले होते. त्यामुळे, भाजप आघाडीला राज्यात फायदा झाल्याचं दिसून येते.
तेलगु देसम पक्षाला मोठी आघाडी
आंध्र प्रदेशमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणूक निकालात 25 जागांपैकी जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने 22 जागांवर विजय मिळवला होता. तर, तेलुगू देसम पक्षाला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, भाजप व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाला येथे एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने 16 जागांवर आघाडी घेतली असून भाजपने 2 जागांवर विजय मिळवला असून आणखी एका जागेवर आघाडी आहे. तर, पवनकल्याण यांच्या जनसेना पक्षाने 2 जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, एनडीएचा घटक पक्ष असलेला चंद्रबाबू नायडूंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदींकडून चंद्राबाबूंना शुभेच्छा
आंध्र प्रदेशमध्ये एनडीए आघाडीला मोठा जनादेश मिळाला आहे. येथील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व आशीर्वादाबद्दल जनतेचे आभार. चंद्राबाबू नायडू आणि पवनकल्याण यांचे अभिनंदन असे ट्विट मोदींनी केले आहे. तसेच, आंध्र प्रदेशच्या विकासासाठी सर्वोतोपरी काम करू, असेही मोदींनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींच्या ट्विटला चंद्राबाबू नायडू यांनी प्रतिक्रिया देत मोदींचे आभार मानले आहे.
काय म्हणाले चंद्राबाबू नायडू
लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाबद्दल आंध्र प्रदेशातील जनतेच्यावतीने मी तुमचे अभिनंदन करतो. आमच्या आंध्र प्रदेशातील जनतेने आम्हाला उल्लेखनीय जनादेश दिला आहे. हा जनादेश त्यांचा आमच्या युतीवरील विश्वास आणि राज्याप्रती असलेल्या व्हिजनचे प्रतिबिंब आहे. आपल्या लोकांसोबत आपण आंध्र प्रदेशची पुनर्बांधणी करू आणि त्याचे वैभव पुनर्संचयित करू, अशी प्रतिक्रिया चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.