सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यांत वाद, सुप्रिया सुळेंची वेळीच मध्यस्ती; लोकसभेत नेमकं काय घडलं?
Smriti Irani : राष्ट्रपतींच्या संबंधी केलेल्या वक्तव्यावरुन सभागृह तहकूब केलं असताना भाजपच्या काही खासदारांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.
![सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यांत वाद, सुप्रिया सुळेंची वेळीच मध्यस्ती; लोकसभेत नेमकं काय घडलं? Lok Sabha Controversy between Sonia Gandhi and Smriti Irani timely mediation by Supriya Sule सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यांत वाद, सुप्रिया सुळेंची वेळीच मध्यस्ती; लोकसभेत नेमकं काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/28/a45425026b11c8232f4b7377c19fa6001659015175_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींच्या संबंधी केलेल्या वक्तव्यावरुन आज चांगलाच गदारोळ झाला. यावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) एकमेकांसमोर आल्या. सभागृह तहकूब झाल्यानंतर त्यांच्यात वाग्युद्ध रंगलं. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळीच मध्यस्ती केली आणि हा वाद निवळला.
आज जे काही संसदेत झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. संसदेतील वाद विवाद झाल्यानंतर तो तिथेच ठेवला जातो. पण आज सभागृह तहकूब झाल्यानंतर ही घटना घडली.
सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी या बाहेर जायला निघाल्या. त्यावेळी भाजपच्या काही खासदारांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सोनिया गांधी मागे आल्या आणि त्यांनी भाजपच्या रमा देवी यांना याबद्दल विचारलं. या दोघींची चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी भाजपचे आणि काँग्रेसचे काही खासदार जमा झाले आणि त्यांनी यामध्ये भाग घेतला. या सर्व प्रकरणात आपलं नाव का घेतलं जातंय असं सोनिया गांधी यांनी विचारल्यानंतर स्मृती इराणी यांनी आपण नाव घेतल्याचं सांगितल्याची माहिती आहे. यावर सोनिया गांधी चांगल्याच संतापल्या.
वातावरण काहीसं गंभीर होत असताना खासदार सुप्रिया सुळे त्या ठिकाणी गेल्या. त्यांनी सोनिया गांधी यांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या की आपण बोलत आहे. त्यानंतर खासदार गौरव गोगोई यांनीही त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर सोनिया गांधी यांना सुप्रिया सुळे बाहेर घेऊन गेल्या आणि त्यांच्या गाडीत बसवलं. सोनिया गांधींनीही त्यावर जास्त वाद न घालता सामंजंस्याची भूमिका घेतली असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हिंदी चांगलं नसल्यानं चूक झाल्याचा दावा
काँग्रेस नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आपली हिंदी चांगली नसल्याचं सांगत त्यावर आपली चूक झाली असून आपण स्पष्टीकरण देण्यास तयार असल्याचं सांगितलं.
काय आहे नेमकी घटना?
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला आणि संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. भाजपने या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी करत गोंधळ घातला. त्यानंतर संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलं. पण यामध्ये आपलं नाव का घेतलं जातंय असा प्रश्न सोनिया गांधी यांना पडला आणि त्यांनी तो भाजपच्या रमा देवी यांना विचारला. त्या ठिकाणी असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपण हे नाव घेतल्याचं सांगितलं, त्यावर सोनिया गांधी संतापल्या. या ठिकाणी असलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर खासदारांनी सोनिया गांधी यांना बाजूला नेलं आणि नंतर हा वाद मिटला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)