एक्स्प्लोर
नोटाबंदी हा 8 लाख कोटींचा घोटाळा, केजरीवालांचा मोदींवर गंभीर आरोप

नवी दिल्ली: मोदी सरकारनं देशावर लादलेला नोटबंदीचा निर्णय हा 8 लाख कोटींचा घोटाळा असल्याची जळजळीत टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. तसेच विजय मल्ल्या आणि मोदींचे कोणते हितसंबंध होते, ज्यामुळे त्याचे कर्ज एसबीआय बँकेने माफ केले, असा सवालही केजरीवाल यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन उपस्थीत केला आहे. केजरीवाल म्हणाले की, ''जर 500 आणि एक हजारच्या नोटा रद्द करुन नंतर 2 हजारच्या नव्या नोटा आणून भ्रष्टाचार कमी होणार असता, तर सगळ्यात आधी मीच मोदींना साथ दिली असती. पण दोन हजारांच्या नोटेनं काळं धन जमवणाऱ्यांना मदतच होणार आहे.'' तसेच नोटबंदी म्हणजे स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून, ही वक्तव्य मी पूर्ण जबाबदारीने करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ''तुम्ही रांगेत तासंनतास उभे राहून आपली कष्टाची कमाई बँकेत जमा कराल, आणि यातून मोठ्या उद्योजकांचे 7 लाख कोटींचे कर्ज माफ केलं जाईल,'' असंही त्यांनी या पोस्टमधून म्हटलं आहे. 'हातच्या कंकणाला आरसा कशाला?' असं विचारत याबाबतचे पुरावे सादर केले. ते म्हणाले की, ''एसबीआयने तीन दिवसांपूर्वी 63 उद्योजकांचे कर्ज माफ केले. त्यामुळे हे देशवासियांना मूर्खात काढत आहेत.''अशी जळजळीत टीका त्यांनी केली. केजरीवाल पुढे म्हणाले की, ''सुरुवातीला विजय मल्ल्याला पळून जाण्यास मदत केली. त्यानंतर त्याचे कर्जही माफ केले. त्यामुळे विजय मल्ल्या आणि मोदी यांच्यात कोणते संबंध आहेत? हे त्यांनी उघड करावं.'' बिर्लावरील आयकर विभागाच्या छाप्यामधील आहवालात लाचखोरीसाठी मोदींच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मल्ल्यांसोबतही मोदींचे आर्थिक हितसंबंध जपले गेले असल्याचा संशय येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा























