छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
बिहारला गेलेले हजारो लोक हे ‘व्यावसायिक मतदार’ (Professional Voters) आहेत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या मतदारसंघात मतदानासाठी नेले जातात, असा गंभीर आरोप कपिल सिब्बल यांनी केला.

Kapil Sibal on Haryana Bihar Special Trains Before Polling: 6 नोव्हेंबरला बिहारमध्ये मतदान होत असताना, त्याच्या तीन दिवस आधी हरियाणातून चार विशेष रेल्वेगाड्या बिहारकडे धावल्याने कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि भाजपवर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. सिब्बल यांनी हा प्रकार “सिस्टमॅटिक धांदलेबाजीचा नमुना” असल्याचं सांगत निवडणुकीपूर्वीचा हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिलं की, या गाड्यांचे बुकिंग कोणी केलं, आणि भाडं कोणी भरलं, हे देशासमोर स्पष्ट करावं.
हे प्रवासी नाहीत, ‘व्यावसायिक मतदार’ आहेत
सिब्बल यांनी दावा केला की, या ट्रेनमधून बिहारला गेलेले हजारो लोक हे ‘व्यावसायिक मतदार’ (Professional Voters) आहेत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या मतदारसंघात मतदानासाठी नेले जातात. त्यांच्या मते, या लोकांकडे बनावट ओळखपत्रे असू शकतात, ईव्हीएम आणि मतदार यादीतील फेरफारात भाजप निष्णात आहे, आणि निवडणूक आयोग त्यांना अप्रत्यक्ष मदत करत आहे.
खर्च कोणी केला? सिब्बल यांची विचारणा
या विशेष गाड्यांचा खर्च सरकारने केला की पक्षाने, यावर सिब्बल यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. “जर सरकारने खर्च केला, तर जनतेच्या पैशावर ही राजकीय सोय का? आणि जर सरकारने नाही, तर कोणत्या पक्षाने? आम्हाला माहिती आहे हा खर्च भाजपनेच केला आहे.” सिब्बल म्हणाले की, “हे लोक 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान बिहारमध्येच होते. त्यांना कुठेतरी ठेवण्यात आलं, खानपान देण्यात आलं, आणि त्यांनी मतदानात ‘काम’ केलं. आता प्रश्न असा आहे की, हे लोक परत आलेत का? परतीची ट्रेन का नव्हती?” सिब्बल यांनी गंभीर आरोप केला की, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन या गाड्या चालवल्या गेल्या, आणि त्यांना हरियाणा भाजप अध्यक्ष मोहन लाल व सरचिटणीस डॉ. अर्चना गुप्ता यांच्याशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले. सरकारकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत सिब्बल यांनी माध्यमांना थेट आवाहन केलं. “देशातील माध्यमांनी स्वतः या गाड्यांची सत्यता तपासावी. सरकारकडून उत्तर मिळणार नाही, पण लोकांसठी सत्य बाहेर आणणं ही माध्यमांची जबाबदारी आहे.”
सिब्बल यांचा रेल्वेमंत्र्यांना थेट सवाल
सिब्बल यांनी उघड केलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणातून बिहारसाठी चार विशेष ट्रेन धावल्या, ज्यामधून सुमारे 6,000 लोक बिहारला पोहोचले.
- पहिली ट्रेन सकाळी 10 वाजता करनालहून बरौनीसाठी,
- दुसरी सकाळी 11 वाजता करनालहून भागलपूरसाठी,
- तर उर्वरित दोन गाड्या दुपारी 3 आणि 4 वाजता गुरुग्रामहून निघाल्या.
फक्त हरियाणातूनच या गाड्या चालवल्या गेल्या
सिब्बल म्हणाले की, “या चार गाड्या खरोखरच नमूद केलेल्या वेळी धावल्या होत्या का? याची सार्वजनिक पुष्टी करा.” ते म्हणाले की, देशभरातील कोणत्याही दुसऱ्या राज्यातून नव्हे, तर फक्त हरियाणातूनच या गाड्या चालवल्या गेल्या. “छठ पूजेसाठी रेल्वेने ट्रेन चालवणे कठीण झालं होतं, पण निवडणुकीच्या तोंडावर मात्र विशेष गाड्या धावतात, का?” ते पुढे म्हणाले की, जर हे लोक बिहारचे खरे मतदार असतील, तर नियमित गाड्यांची सोय का नव्हती? आणि जर ते मतदार नसतील, तर हे स्पष्टच आहे की ‘धांदलेबाज मतदार’ पाठवले गेले. सिब्बल यांनी लक्ष वेधले की, या गाड्या ३ नोव्हेंबरला पोहोचल्या आणि मतदान ६ नोव्हेंबरला झालं. त्यामुळे दोन्ही घटनांमधील संबंध “अत्यंत स्पष्ट” असल्याचं त्यांनी म्हटलं.
इतर महत्वाच्या बातम्या























