जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडलं
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील हंदवाड्यात लष्करानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं केलेल्या कारवाईदरम्यान या 4 दहशतवाद्यांना पकडलं.
श्रीनगर : नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या 4 नवख्या दहशतवाद्यांना लष्करानं जिवंत पकडलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यातील हंदवाड्यात लष्करानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं केलेल्या कारवाईदरम्यान या 4 दहशतवाद्यांना पकडलं.
यावेळी या दहशतवाद्यांसोबत असलेल्या अल बदर दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले. लष्कराने त्यांची शोधमोहीम सुरु केली आहे. पोलिस, लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये थोडी चकमक झाल्यानंतर दहशतवाद्यांना शरणागतीसाठी आवाहन करण्यात आलं, त्यानंतर नव्यानं दहशतवादी झालेल्या चौघांनी शरणागती पत्करली.
श्रीनगरचे लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अल बदरच्या तीन दहशतवाद्यांच्या नेतृत्वात चार नवखे दहशतवादी सीमारेषा ओलांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लष्कराने संयुक्त अभियान सुरू केलं. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी सापळा रचून दहशतवाद्यांना घेरलं. लष्कराच्या कारवाईनंतर थोडा वेळ तेथे गोळीबार झाला, मात्र नंतर लष्कराच्या आवाहनानंतर चार दहशतवादी शरण आले. तीन दहशतवाद्यांनी मात्र तेथून पळ काढला."