IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार!
भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. एकीकडे एलएसीवर चीनसोबत तणाव सुरु असतानाच हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला दिसेल. राफेल लढाऊ विमान हे आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आहे.
हिंडन (गाझियाबाद) : भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. एकीकडे एलएसीवर चीनसोबत तणाव सुरु असतानाच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला दिसेल. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायलं मिळतील. राफेल लढाऊ विमान हे यंदाचं प्रमुख आकर्षण आहे.
आज हिंडन एअरबेसवर फ्लाय पास्टची सुरुवात 'आकाशगंगा' म्हणजेच आकाशातून पॅरा-जम्पने होईल. या पॅरा-जम्पमध्ये हवाई दलाचे जवान ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टमधून पॅराशूटच्या मदतीने उडी मारतील. यानंतर निशान-टोली सह सैनिक मार्च पास्ट करतील. मग हवाई दलाचे हेवी-लिफ्ट मी-17 हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर हिंडन एअरबेसवर फ्लाय पास्टची सुरुवात होईल. मी-17 नंतर नुकतेच अमेरिकेकडून खरेदी केलेले चिनूक हे हेवीलिफ्ट हेलिकॉप्टर. चिनूक हेलिकॉप्टर्स फील्ड-गन्स म्हणजे तोफ आणि इतर अवजड वस्तू नेताना दिसतील. यानंतर सी-17 ग्लोबमास्टर आणि आयएल-76 मिलिट्री ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट येतील. हिंडन एअरबेसवरही सी-130 जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमान स्टेटिक-डिस्पलेमध्ये दिसतील. या सर्व हेलिकॉप्टर आणि मालवाहतूक करण्याऱ्या विमानांचा वापर नुकताच एलएसीवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान सैनिक, टँक तोफ आणि इतर सैनिकांना सामानांसह वेगाने फॉरवर्ड लोकेशनवर पाठवण्यासाठी झाला होता.
हिंडन एअरबेसच्या स्टेटिक डिस्पलेमध्येही राफेलला मधलं स्थान देण्यात आलं आहे. फ्लाय पास्टच्या दोन फॉर्मेशन्समध्येही राफेलचा समावेश आहे. 'विजय' फॉर्मेशनमध्ये राफेलसोबत मिराज-2000 आणि जॅग्वार लढाऊ विमानं असतील. तर ट्रान्सफॉर्मर फॉर्मेशनमध्ये स्वदेशी एलसीए-तेजस आणि सुखोई लढाऊ विमानं असतील. आज हिंडन एअरबेसवर स्वदेशी लढाऊ विमान तेजसही राफेलसोबत आकाशात प्रात्यक्षिके करताना दिसेल. याशिवाय सुखोई, मिग-29, मिराज2000 आणि जॅग्वारही आकाशात भारताच्या हवाई ताकदीचा परिचय करुन देतील. सोबतच स्टेटिक डिस्पलेमध्ये अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, आकाश मिसाईल सिस्टम, टोही विमान अवॅक्स आणि स्वदेशी रडार सिस्टम, रोहिणीही हिंडन एअरबेसवर दिसतील. प्रेक्षकांसाठी खास सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण विमानांची टीम एअरोबेटिक्स करताना दिसतील.
असा असेल कार्यक्रम
·हिंडन एअरबेसवर सकाळी 8 ते 11 पर्यंत हा कार्यक्रम असेल.
·सकाळी 8 वाजता - परेडने सुरुवात होईल. आकाशगंगा टीम पॅरा जम्प करेल.
·सकाळी 9 वाजता - हवाईदल प्रमुखांचं भाषण होईल.
·सकाळी 9.58 वाजल्यापासून 10.45 वाजेपर्यंत - फ्लाय पास्ट अर्थात प्रात्यक्षिके होतील.
88व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हवाई दलानेएक खास व्हिडिओ आणि गीतही पण बनवलं आहे.देशभक्ति, वीरता, त्याग, सामर्थ्य एवम् साहस के प्रतीक - भारतीय वायुसेना के जाँबाज़ वायु योद्धा।
— Indian Air Force (@IAF_MCC) October 7, 2020
भारतीय वायु सेना गान ।#AFDay2020 pic.twitter.com/7eURlNWmoq