(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agni-5 Missile Launch : चीनची झोप उडणार! भारताकडून 'अग्नी 5' चे यशस्वी परीक्षण
Agni 5 : 'अग्नी 5' हे आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल (Inter-Continental Ballistic Missile) असून 5000 किमीपर्यंतचे लक्ष्य अचूक भेदण्याची त्याची क्षमता आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या भात्यात चीनसह पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राचा समावेश झाला आहे. तब्बल 5000 किमीची मारक क्षमता असलेल्या 'अग्नी 5' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ओडिशामधील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून संध्यााकाळी 7.30 मिनीटांनी ही चाचणी घेण्यात आली असून त्यामुळे भारतीय लष्कराच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे.
अग्नी 5 ची यशस्वी चाचणी ही भारताच्या लष्करला बळ देणारी तसेच पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणारी आहे. या आधी 'अग्नी 5' या मिसाईलचे सात वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. भारताने ही चाचणी स्वत: संरक्षणासाठी घेतली असून नो फर्स्ट यूज या पॉलिसीला भारत बांधिल असल्याचं भारतीय संरक्षण खात्याने स्पष्ट केलं आहे.
अग्नी 5 हे भारताचे इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) आहे. याची निर्मिती डीआरडीओने (DRDO) केली आहे. भारताने या मिसाईलच्या निर्मितीची सुरुवात 2008 साली केली होती. त्यानंतर आतापर्यंत याची सात वेळा परीक्षण घेण्यात आलं आहे. या मिसाईलच्या माध्यमातून न्युक्लियर वेपन्स कॅरी करता येऊ शकतात. हे मिसाईल सहजपणे वाहून नेता येऊ शकतं.
अग्नी 5 या मिसाईलचा वेग हा 24 मॅक इतका असून तो आवाजाच्या वेगाच्या 24 पट हा वेग असल्याचं सांगितलं जातं. अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा पल्ला हा पाच हजार किलोमीटर इतका आहे. आशिया, आफ्रिका आणि युरोपातील अनेक देश या मिसाईलच्या टप्प्यात येणार असल्याने भारताच्या लष्करी शक्तीत चांगलीच वाढ झाली आहे.
भारताच्या उत्तर सीमेवर चीनसोबत वाद सुरु असताना, या दोन देशांदरम्यान तणाव वाढला असताना भारताने ही चाचणी केली आहे. त्यामुळे या चाचणीला महत्व प्राप्त झालं आहे.
संबंधित बातम्या :