APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे 'मिसाईल मॅन' अब्दुल कलामांच्या बाबतीत 'या' दहा गोष्टी माहिती आहेत का?
APJ Abdul Kalam Death Anniversary : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी.
APJ Abdul Kalam : भारताचे 'मिसाईल मॅन' आणि 'पीपल्स प्रेसिडेन्ट' अशी ओळख असलेल्या महान वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलामांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी 2002 ते 2007 या काळात भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून उल्लेखनीय कार्य केलं. आजच्याच दिवशी, 27 जुलै 2015 रोजी मेघालयातील शिलॉंग येथे त्यांचा मृत्यू झाला होता.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जन्म झाला. तिथपासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासाने वैज्ञानिक ते भारताचे राष्ट्रपती असा थक्क करणारा पल्ला गाठला. या काळात त्यांनी अनेक यश अपयश पचवले. अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांनी त्यांना भारताचा 'मिसाईल मॅन' म्हणून आकाशाला गवसणी करणारी ख्याती मिळवून दिली. तरीही या अवलियाचे पाय सतत जमिनीवरच राहिले हे आश्चर्य आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची खरी ओळख ही शिक्षक हीच होती आणि तीच ओळख त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपली.
डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या बद्दल या दहा रंजक गोष्टी
- राष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना केवळ एक सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवन सोडताना अनेकांनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 2500 पुस्तके, 6 पँट्स, 4 शर्ट, 16 डॉक्टरेटच्या पदव्या, एक पद्मश्री, एक पद्मभूषण आणि भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' एवढीच संपत्ती होती.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या कारकीर्दीत भारताला अनेकवेळा अभिमान वाटावा असे काम केले. भारताचे पहिले रॉकेट एसएलव्ही-3 आणि पीएसएलव्ही चा विकास करण्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
- भारतीय लष्कराला शक्तीशाली बनवणाऱ्या 'पृथ्वी' आणि 'अग्नी' क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांच्या नेतृत्वाखाली झाली.
- जगाला भारताची ताकद दाखवणारा पोखरणचा स्फोट त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आला. त्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या प्रत्येक कामगिरीने देशाची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचच झाली आहे.
- विंग्ज ऑफ फायर, इंडिया 2020, व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, मिशन ऑफ इंडिया: अ व्हिजन ऑफ इंडियन युथ यासारखी 25 प्रसिद्ध पुस्तकांचे लेखन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केलं.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 या काळात भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून उल्लेखनीय कार्य केलं आहे.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशातील आणि विदेशातील 48 विद्यापीठांनी आणि संस्थांनी डॉक्टरेटच्या पदवीने सन्मानित केले आहे.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना पद्म भूषण (1981), पद्म विभूषण (1990) आणि भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'भारतरत्न' (1997) ने गौरवले आहे. 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलेले ते तिसरे राष्ट्रपती आहेत.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे 1992 ते 1999 या काळात पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार होते.
- डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र असलेल्या 'विंग्ज ऑफ फायर'चे फ्रेन्च आणि चीन सहित 13 भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.
अशा या अवलियाचे स्मरण आज संपूर्ण देश करत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य युवकांना सातत्याने प्रेरणा देत राहिल यात शंका नाही.
संबंधित बातम्या :
- World IVF Day: आज जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून जाणून घ्या...
- World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व
- CA Day 2020: 1 जुलैलाच सीए डे का साजरा केला जातो? आयसीएआयशी संबंधित या विशेष गोष्टी जाणून घ्या