Monsoon 2022 : खुशखबर... मान्सून वेळेआधीच धडकणार, 27 मे रोजी केरळमध्ये आगमन होणार
Maharashtra Monsoon 2022 : पोषक वातावरण राहिल्यास केरळनंतर सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे.
मुंबई: उष्णतेनं हैराण झालेल्या देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी मान्सूनचं आगमन वेळे आधीच होणार आहे. येत्या 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. पोषक वातावरण राहिल्यास त्या पुढच्या सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.
केरळमध्ये मान्सून हा साधारणपणे 31 मे रोजी दाखल होतो. गेल्या वर्षी जूनमध्ये मान्सून दाखल झाला होता. आता या वर्षी आलेल्या चक्रीवादळाचा काही प्रमाणात मान्सूनवर परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तब्बल पाच दिवस आधी मान्सून केरळमध्ये धडकणार आहे असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
केरळमध्ये 2022 च्या नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज:
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2022
यावर्षी, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन सामान्य तारखेच्या काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे.
यावर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन 27 मे रोजी ± 4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे.
IMD pic.twitter.com/0dK0gj41H6
भारतात पाच दिवस मान्सून आधी धडकणार असल्यामुळे त्याचा फायदा हा देशातील शेतकरी तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अंदमानातही मान्सून वेळे आधीच दाखल दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून 22 मेपर्यंत दाखल होत असतो. मात्र, यंदा 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे.
बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.