Rajya Sabha : आपची घोडदौड सुरुच, शिवसेना-राष्ट्रवादीलाही टाकणार मागे
Rajya Sabha : पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर केजरीवाल यांच्या आप पक्षाच्या राज्यसभेतील जागा वाढणार आहेत. राज्यसभेतील आप पक्षाचा दबदबा वाढणार आहे.
Rajya Sabha : पंजाबमधील ऐतिहासिक विजयानंतर केजरीवाल यांच्या आप पक्षाच्या राज्यसभेतील जागा वाढणार आहेत. राज्यसभेतील आप पक्षाचा दबदबा वाढणार आहे. सध्या आप पक्षाचे तीन राज्यसभा सदस्य आहेत. पंजाबमधील विजयानंतर यामध्ये आणखी सहा सदस्यांची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यसभेत सर्वाधिक खासदार असणाऱ्यांमध्ये आप पाचव्या क्रमांकावर पोहचणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेना (तीन राज्यसभा खासदार) आणि राष्ट्रवादीपेक्षाही (चार राज्यसभा खासदार) जास्त राज्यसभा खासदार आप पक्षाकडे होणार आहेत. पंजाबमधल्या ऐतिहासिक विजयानंतर आम आदमी पक्षाचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान मजबूत होताना दिसतंय. पंजाबच्या विजयानं आपची राज्यसभेतली ताकद चांगलीच वाढणार आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या संख्येतही आपनं काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाशी अल्पावधीत बरोबरी केलीय.
पंजाबमधील अकाली दल पक्षाचा राज्यसभेतील सुपडा साफ होणार आहे. अकाली दल पक्षाचा एकही खासदार राज्यसभेत राहणार नाही. तर बसपा पक्षाचा फक्त एक खासदार राहणार आहे. सध्या वायएसआरचे सहा खासदार, सपा आणि आरजेडी पक्षाचे पाच राज्यसभा खासदार आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर आप पक्षाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या नऊवर जाणार आहे. पंजाबमधल्या दणदणीत विजयाचा पहिला बोनस आम आदमी पक्षाला पुढच्या 20 दिवसातच मिळणार. पंजाबमध्ये राज्यसभेच्या पाच जागांसाठी 31 मार्चला निवडणूक होतेय.. यामधील चार जागा आप पक्षाच्या वाट्याला जाणार आहेत. यामध्ये थोडंसं गणित जुळवलं तर या पाचही जागा आप जिंकू शकतं. तसेच चार जुलै रोजी पंजाबमधील आणखी दोन राज्यसभा जागा खाली होणार आहेत. या दोन्हीही जागा आप पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या पक्षाचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन किती झपाट्यानं वाढतंय याचंच हे निदर्शक म्हणावं लागेल.
राज्यसभेतील एकूण सदस्यांची संख्या 250 इतकी असते. यामधील 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशातील प्रतिनिधी असतात. तर 12 सदस्य राष्ट्रपती नियुक्त असतात. राज्यसभेत सध्या भाजपचे 97, काँग्रेसचे 34, तृणमूल काँग्रेसचे 13, डीएमकेचे 10 तर बिजू जनता दलाचे 9 खासदार आहेत. पंजाबमध्ये राज्यसभेच्या एकूण जागा 7 आहेत. आता 5 तर भविष्यात अजून 2 जागाही आपला मिळू शकतात. त्यामुळे दिल्ली, पंजाब या दोन राज्यांच्याच जोरावर आप राज्यसभेत 10 जागांपर्यंत पोहचू शकतं.
राज्यसभेत कोणत्या पक्षाच्या किती जागा?
भाजप – 97
काँग्रेस – 34
तृणमूल काँग्रेस - 13
डीएमके – 10
बीजेडी – 9
सीपीआय (मार्क्सवादी) – 6
टीआरएस 6
वायएसआर - 6
आरजेडी – 5
समाजवादी पार्टी – 5
एआईएडीएमके - 5
जनता दल यू – 4
राष्ट्रवादी काँग्रेस – 4
शिवसेना – 3
आप - 3